भंडारा पोलिसांकडून मानवंदना : सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न अधुरे वरठी : भारतीय नौदल अकादमीत प्रशिक्षणादरम्यान वरठी येथील १९ वर्षीय तरूण प्रणय शिवचरण लांजेवार याचा मृत्यू झाला. सदर घटना २५ जुलै रोजी केरळ येथील इझिमाला प्रशिक्षण केंद्रात घडली. बुधवारला मध्यरात्री त्याचे पार्थिव नागपूर येथे आणण्यात आले. गुरूवारला सकाळी वरठी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय नौदल प्रशिक्षण अधिकारी, एअर फोर्स विंग नागपुर व भंडारा पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली. शिवचरण लांजेवार यांचा प्रणय हा एकुलता मुलगा होता. शिवचरण हे सैन्यात नोकरीवर होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते कुटुंबासह वरठी येथे स्थायिक झाले. त्यांचे मुळ गाव तुमसर तालुक्यातील मेहगाव आहे. वडील सैन्यात नोकरीवर असल्यामुळे त्याचे शिक्षण सैनिकी शाळेच्या तालमीत झाले. प्राथमिक शिक्षण सिलीगुडी येथील सैनिकी शाळा व ७ ते १२ पर्यंतचे शिक्षण राष्ट्रीय सैनिकी शाळा बेलगाव येथे झाले. शालेय जीवन सैनिकी शाळेत झाल्यामुळे त्याला देशसेवा करण्याची आवड निर्माण झाली. चाणाक्ष बुद्धी व शिस्त यामुळे सुरूवातीपासूनच शिक्षणात अग्रेसर होता. कोणत्याही परिस्थितीत सैन्यात दाखल व्हायचे व उच्चपदस्थ अधिकारी व्हायचे म्हणून त्याची धडपड होती. यावर्षी भरतीकरिता झालेल्या प्रवेश परीक्षेत भारतातून ३० मुलांची निवड झाली. त्यापैकी तो एक होता. ११ जुलै रोजी त्याने प्रशिक्षण केंद्रात दाखल होऊन प्रशिक्षणात सुरुवात केली. २५ जुलै रोजी प्रशिक्षणात सराव करीत असताना तो अचानक खाली कोसळला. त्याला तात्काळ दवाखान्यात हलविण्यात आले. परंतु त्याची प्राणज्योत मालविली. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत अडथळा निर्माण झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. संपूर्ण अहवाल येण्यासाठी दोन आठवडे लागणार आहे. अंत्यसंस्कारासाठी लेफ्टनंट कमांडर राजेश पाटील, धर्मेश चेगंपा, नागपूर एयर फोर्सचे विंग राईटफेफ्ट सुदीप गयान यांच्यासह ६ सहकारी उपस्थित होते. राष्ट्रध्वजात मृतदेह होता. एकुलता मुलगा गमावल्याचे दु:ख उराशी बाळगुन आई-वडील यांनी प्रणयला खांदा देत साश्रुनयनांनी निरोप दिला. यावेळी वरठी येथील चौका-चौकात गर्दी होती. भंडारा पोलीस दलातर्फे वरठीचे पोलीस उपनिरीक्षक जी.एन. खंडाते यांच्या उपस्थितीत बंदुकाची सलामी देण्यात आली. यावेळी सरपंच संजय मिरासे, रविद्र बोरकर, दिलीप उके, मिलींद धारगावे व वरठी येथील माजी सैनिक उपस्थित होते. (वार्ताहर) ३४ दिवसांचा प्रवास प्रणय अभ्यासात हुशार होता. गतवर्षी त्यांचा नंबर हुकला. यावर्षी मेहनत करून संधी मिळवली. एक वर्ष वाया जावूल नये म्हणून त्याने इजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. पण त्यात त्याचे मन लागत नव्हते. मला साधारण जीवन जगायचे नाही, म्हणून बोलून दाखवायचा. ११ ते २४ जुलैपर्यत का होईना त्याने ठरविलेले जीवन तो जगला. प्रणय हा आॅफिसर कॅडेड म्हणून निवडल्या गेला होता. चार वर्षाच्या प्रशिक्षणानंतर तो प्रथम श्रेणी दर्जाचा अधिकारी होणार होता. त्याच्या अचानक मृत्युमुळे नौदलात त्याची उणीव जाणवेल. अधिकारी म्हणून त्याने जिल्हा व वरठी गावाचे गौरव वाढवले असते. असे उद्गार लेफ्ट. कंमाडर पाटील यांनी काढले. साहेब ! लगेच जावू नका, भेटून जा ! तरुण मुलगा गमवल्यानंतरचे दु:ख पालकानाच जाणवते. एकुलता मुलगा गमावल्याचे दु:ख झेलणाऱ्या आईला मात्र मुलाच्या अधिकाऱ्यांच्या विसर पडला नाही. अंत्यसंस्कारासाठी काही अंतरापर्यंत आलेल्या प्रणवच्या आईने प्रशिक्षण अधिकारी राजेश पाटील यांना पाहताच थांबली. दु:खाच्या या परिस्थितीतही तिने, ‘साहेब, लगेच जावू नका, भेटून जा’ असे आपुलकीने बोलली. काळजाचा तुकडा पंचतत्वात विलीन होत असताना आईची ममता तिच्या डोळ्यातून अश्रुंच्या रुपाने वाहत होती.
नौदल अकादमीत प्रणयवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By admin | Updated: July 29, 2016 00:36 IST