शासनाने ज्येष्ठ नागरिकांनंतर ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरिकांसाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ, पिंकू मंडल यांच्या मार्गदर्शनात गेल्या १५ दिवसांपासून लसीकरण सुरू आहे. लसींच्या उपलब्धतेनुसार नियोजन करून लस देणे सुरू असले तरीही येथील प्राथमिक आरोग्य केद्रांतर्गत ५ आरोग्य उपकेंद्रे कार्यान्वित आहेत. यामधील लोकसंख्येच्या प्रमाणात आणि लसीकरणाचा वेग लक्षात घेता मुबलक लस पुरवठा होणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लस शनिवारी संपल्यामुळे अनेक नागरिकांना घरी परत जावे लागले.
सध्या गाव व परिसरात अनेक कोरोनाबाधित रुग्ण अलगीकरणात उपचार घेत आहेत. कोविड प्रतिबंधात्मक लसींचा साठा तत्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून साठा प्राप्त होताच लसीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येईल. कोरोना रौद्ररूप धारण करू पाहत आहे. मात्र, कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोना लसीपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
डॉ. पिंकू मंडल, आरोग्य अधिकारी