स्कॉटलंड येथील एडिनबर्ग विद्यापीठात निवड : जे.एम. पटेल महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
भंडारा : स्थानिक जे.एम. पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी शिवानी वालदेकर यांची पदव्युत्तर संशोधनासाठी स्कॉटलंड येथील एडिनबर्ग विद्यापीठात निवड झाली आहे. राज्य शासनाची छत्रपती शाहू महाराज विदेश शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. घरची परिस्थिती कमकुवत असतानाही तिने हे यश प्राप्त केले. हाताने मैला साफ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर तिचे हे प्रस्तावित संशोधन असणार आहे. शिवानीने स्थानीय जे.एम. पटेल महाविद्यालयातून पदवी आणि समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले. दलित आणि स्त्री- जीवनावरील तिचे लेख अनेक ऑनलाइन नियतकालिकांतसुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. यानिमित्ताने जे.एम. पटेल महाविद्यालयाने प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या हस्ते तिला मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला. याप्रसंगी बोलताना डॉ. ढोमणे यांनी तिला पुढील भविष्यासाठी सुयश चिंतिले. ते म्हणाले, परिस्थितीचा कोणताही बाऊ न करता शिवानीने प्राप्त केलेले हे यश आपल्या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहे. शिवानीने आपल्या महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना यशाच्या नवीन दिशा
दाखविलेल्या आहेत. कार्यक्रमाचे संचालन करताना डॉ. प्रदीप मेश्राम यांनी शिवानीने शिक्षणासाठी केलेला संघर्ष आणि तिने प्राप्त केलेल्या यशाची उजळणी करताना तिने अधिक मोठे यशोशिखरे गाठावीत, अशी आशा व्यक्त केली. याप्रसंगी शिवानीने आपले मत व्यक्त केले. ती म्हणाली की, या महाविद्यालयाने तिला तिचा सामाजिक दृष्टिकोन घडविण्याची संधी दिली. त्यामुळे तिला शिक्षणासाठी अधिक प्रोत्साहन प्राप्त झाले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या स्त्री अध्ययन अभ्यास आणि इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या क्रियाशील सहभागामुळे मी अधिक प्रगल्भ झाली. अशा अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी अधिक सहभाग नोंदवून स्वतःला परिपक्व करावे, असा सल्ला तिने दिला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कार्तिक पणिक्कर यांच्या सहयोगाने समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रदीप मेश्राम यांनी केले. प्रसंगी प्रा. सुमंत देशपांडे, डॉ. निशा पडोळे, डॉ. विनी ढोमणे, डॉ. विजया कन्नाके, प्रा. ममता राऊत, अजय देवकाते, भोजराज श्रीरामे, तसेच समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक किरण राघोर्ते, तृप्ती गणवीर आणि अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे सदस्य डॉ. वीणा महाजन, डॉ. अपर्णा यादव, डॉ पद्मावती राव आदींची उपस्थिती होती.