शंकरपटावर पुन्हा बंदी : अनेक ठिकाणी केले होते आयोजन, पटाची दान तयार करण्याचे सुरू झालेले काम पुन्हा थांबलेभंडारा : मागील तीन वर्षांपासून शंकरपटावर बंदी असताना चार दिवसांपूर्वी केंद्रीय पर्यावरण विभागाने शंकरपटावरील बंदी उठविण्याची घोषणा केली. त्यामुळे पटप्रेमींमध्ये उत्साह संचारला होता. परंतु ‘पेटा’ या प्राणीमित्र संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने पुन्हा शंकरपटावर बंदी कायम ठेवण्यात आली. त्यामुळे अवघ्या चार दिवसातच उत्साह संचारलेल्या पटप्रेमींचा हिरमोड झाला.भंडारा जिल्ह्यात परसोडी आणि गोसेबुज येथील शंकरपटाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील शंकरपट गर्दी खेचणारा होता. याशिवाय साकोली, सानगडी, बाम्पेवाडा, मोखेकिन्ही, परसोडी, निलागोंदी, केसलवाडा, पिंपळगाव, कोलारी (पटाची) या महत्त्वाच्या गावांसह अन्य गावात छोटे शंकरपटाचे आयोजन करण्यात येत होते. मागील तीन वर्षांपासून शंकरपटावर बंदी असल्यामुळे पटप्रेमीमध्ये निरूत्साह होता. परंतु बंदी हटविण्यात आल्याची घोषणा होताच पटशौकीनांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र चार दिवसातच हा उत्साह मावळला. केंद्र सरकारने शुक्रवारला शंकरपटावरील बंदी उठविल्यामुळे शंकरपटाच्या दाणीवर पुन्हा बैल धावणार होते. सुरक्षेचे नियम सांगत प्राण्यांसोबत क्रुरता होणार नाही, याची काळजी घेत पारंपरिक आणि सांस्कृतिक वैभव टिकवून ठेवण्याचे प्रयत्न यामागे असल्याचे सांगण्यात आले. शंकरपटावरील बंदी उठविण्याच्या घोषणेनंतर भंडाऱ्याचा बैल बाजार तेजीत दिसून आला. या बैल बाजारात बैल बाजारात पटशौकिनांचा मेळा दिसून आला. मागील तीन वर्षांपासून बैलांच्या किमंती मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे कसायाकडे गोधन विक्रीचे प्रमाण वाढले होते. परंतु रविवारच्या बैल बाजारात पटासाठी बैल खरेदी करणाऱ्या पटप्रेमींची संख्या दिसून आली. चार दिवसातच शंकरपटाची तयारी करीत हरदोली (झंझाड), गराडा, मोहाडी, करडी येथे शंकरपटासाठी दान तयार करण्यात आले आहेत. आयोजनाचे पत्रकेही छापण्यात आले. अनेक गावांत ईनामी शंकरपटाचे आयोजन करून बक्षिसांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली. शंकरपटासाठी काहींना आमंत्रित करण्यात आले होते. आता शंकरपट बंदीच्या निर्णयामुळे आयोजकांसह पटशौकिनांना आर्थिक फटका बसला आहे. तीन वर्षांनंतर शंकरपटाचे आयोजन होणार असल्यामुळे पटप्रेमी व शेतकऱ्यांमध्ये संचारलेला उत्साह अवघ्या चार दिवसातच मावळल्यामुळे शंकरपट शौकिनांमध्ये नाराजी पसरली आहे. आता या निर्णयाविरुद्ध पटप्रेमी न्यायालयात धाव घेणार आहेत. पाहू या शंकरपट सुरू राहतील की बंदी कायम राहील ते. (नगर प्रतिनिधी)
चार दिवसातच शंकरपटप्रेमींचा हिरमोड
By admin | Updated: January 14, 2016 00:25 IST