वरिष्ठांना निवेदन : अट शिथील करण्याची मागणीभंडारा : राज्यातील मान्यता प्राप्त अनुदानित, विना अनुदानित व कायम विना अनुदानित माध्यमिक शाळांची २०१३-१४ ची संच मान्यता मिळाली होती. यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढणार असल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.विदर्भातील सर्व जिल्ह्यात माध्यमिक शाळांच्या शिक्षकांच्या संदर्भात संच मान्यतेचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता ५ ते १०साठी वेगवेगळ्या बाबी विचारात घेऊन संच मान्यता काढण्यात आली. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याबाबत शिक्षकांच्या विविध संघटनांनी त्यांच्यावर लटकलेल्या टांगत्या तलवारीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यात शिक्षकांवरील होत असणाऱ्या अन्यायाचा सर्वकष विचार करून शासनाने स्थगिती देऊन जुन्या नियमाप्रमाणे संच मान्यता देण्यात यावी व अतिरिक्त होऊ पाहणाऱ्या शिक्षकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ भंडाराच्या माध्यमातून शिक्षण विभागाचे सचिव, आयुक्त, शिक्षणाधिकारी माध्यमिक भंडारा यांना निवेदन देवून कैफियत मांडली. या शिष्टमंडळात राजेश धुर्वे, चंद्रशेखर रहांगडाले, पी.एच. लांजेवार, धीरज बांते, पी.एम. वालदे, बी.एस. टेंभुर्णे, जे.डी. पोकडे, शाम गावळ, वंजारी, किरणापुरे, भदाडे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
संच मान्यतेची शिक्षकांवर टांगती तलवार
By admin | Updated: August 1, 2014 00:09 IST