जनजागृती : राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचा प्रारंभभंडारा : वार्षिक कृती आराखड्यासाठी निवडलेल्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये किमान शौचालय नसलेली १०० कुटुंब असतील अशा ५५ ग्रामपंचायतीची निवड राष्ट्रीय स्वच्छता अभियानासाठी करण्यात आलेली आहे.केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेवर आधारित राष्ट्रीय कार्यक्रमाला बळकटी देण्याकरिता २३ आॅक्टोंबरपर्यत राज्यभर राष्ट्रीय स्वच्छता अभियान या नावाने जनसंवाद माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात नुकतीच पार पडली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल द्विवेदी, तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यपालन अधिकारी एस. एच. आडे उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डि. एस. बिसेन यांनी केले. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्वच्छता अभियानाची माहिती देवून अभियान दरम्यान राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्याकरिता एस. एच. आडे यांनी मार्गदर्शन करुन अभियानाची अंमलबजावणीबाबत माहिती देताना राष्ट्रीय स्तरावरुन ग्रामीण स्वच्छतेच्या निर्मल भारत अभियान या कार्यक्रमाची अंमलबजावणी २ आॅक्टोंबर २०१९ पर्यंत पूर्ण करावे यासाठी मिशन स्वच्छ भारत या नावाने केंद्र शासनाच्यावतीने हे अभियान २३ आॅक्टोबरपर्यत राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. राहुल द्विवेदी यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अभियानाच्या माध्यमातून तालुकास्तरीय गट समन्वयक यांनी अंगणवाडी सेविका, निर्मल दूत, रोजगार सेवक, जल सुरक्षक, परिचर यांना सोबत घेऊन दररोज ३० घरांना भेटी देऊन ग्रामस्थांना शौचालय बांधणे व त्यांचा वापर करणे, शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहाची उपलब्धता, हात धुण्याचे महत्त्व, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व परिसर स्वच्छता, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी व साठा हे संदेश देऊन ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी जास्तीत जास्त गृहभेटी करण्यावर भर दिला. त्याचप्रमाणे पंचायत समिती स्तरावर बैठक घेऊन ग्रामस्तरावरील नियोजन करण्यास सांगितले. तालुकास्तरावर शालेय विद्यार्थ्यांची सामूहिक प्रभातफेरी काढून, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यास सांगितले. जेणे करुन अभियानाची प्रचार प्रसिध्दी करता येईल. या अभियान कालावधीत महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था व प्रथम शौचालयाचे बांधकाम सुरु करणाऱ्या कुटुंबाचा सत्कार करणे तसेच सर्वाधिक गृहभेटी करणाऱ्या बोआरसी व सीआरसी यांचा सत्कार करणे या बाबीवर विशेष भर देण्यात येणार आहे. या बैठकीला भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी व विस्तार अधिकारी (पंचायत), गट समन्वयक (पाणी व स्वच्छता) तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाचे तज्ज्ञ अजय गजापूरे, अंकुश गभणे, गजानन भेदे, नीलिमा जवादे, नेत्रदीपक बोडखे व प्रशांत मडामे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
५५ ग्रामपंचायतींची निवड
By admin | Updated: September 29, 2014 23:00 IST