परिविक्षाधीन वनाधिकाऱ्याची कारवाई : अनेक महिन्यांपासून सुरु होते दारु गाळण्याचे अड्डेमोहन भोयर तुमसरवनपरिक्षेत्रांतर्गत येरली जवळील पचारा येथील जंगलात अवैध मोहफुल दारु गाळप केंद्र आयएफएस दर्जाच्या एका अधिकाऱ्याने उध्वस्त केले. मागील काही महिन्यापासून अवैध दारु गाळप केंद्र येथे सुरु होते. तुमसरपासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर राजरोसपणे हा अड्डा सुरु होता. येथे पोलीस तथा वनविभागाचे अर्थपूर्ण संबंध असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तुमसर शहरापासून चार कि.मी. अंतरावर येरली जवळील पचारा गावाजवळील तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत जंगलात मागील अनेक महिन्यापासून अवैध मोहफुल दारु गाळप करणे राजरोसपणे सुरु होते. परंतु त्या अड्यांवर पोलीस तथा वनविभागाने कारवाई केली नाही. तुमसर वनपरिक्षेत्राधिकारी (प्रशिक्षणार्थी) म्हणून आयीफएस अरविंद मुंढे १५ दिवसापूर्वी रूजू झाले. त्यांनी तुमसर वनपरिक्षेत्राचा संपूर्ण अभ्यास केला. पचारा येथील जंगलात त्यांना अवैध मोहफुल दारु गाळप केंद्र सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली. येथील वनपरिक्षेत्राधिकारी अरविंद जोशी, लेंडेझरीचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.यु. मडावी यांच्यासोबत या दारु गाळप केंद्रावर गोपनीय पद्धतीने छापा मारण्याचा निर्णय घेण्यात आला.भरदिवसा परिविक्षाधीन वनपरिक्षेत्राधिकारी अरविंद मुंढे तथा सहकाऱ्यांनी पचारा येथील दारु गाळप केंद्रावर छापा घातला. तेथे काम करणारे मजूर पळून जाण्यास यशस्वी झाले. जंगलातील दारु गाळप केंद्राजवळील लाकडे त्यांनी जप्त केली. रात्री येथे मोठ्या प्रमाणात मोहफुल दारु गाळप केली जात होती. या अड्यावर सहसा कुणी धाड मारण्याचा प्रयत्न केला नाही. ही टोळी गुंड प्रवृत्तीची असल्याचे समजते. सुमारे ५० जण या दारु गाळप केंद्रावर कामे करीत होती. येथील ही अवैध दारु तुमसर शहर व परिसरात विक्री केली जात होती.पोलीस प्रशासनाला या दारु अड्याविषयी माहिती नव्हती काय? हा मुख्य प्रश्न आहे. सहसा जंगलात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशीवाय कुणी जात नाही. तशी त्यांना परवानगी नाही. परंतु दारु गाळप केंद्रावर सामूहिक कारवाई नक्कीच करता येते. बीट गार्ड, सहाय्यक वनपरिक्षेत्राधिकारी, महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी, गावातील ग्रामसेवक यांनाही या दारु गाळप केंद्राविषयी माहिती नक्कीच असेल, परंतु मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार असा प्रश्न त्यांना नक्कीच पडला असावा. असेच अवैध मोहफुल दारु गाळप केंद्र लेंडेझरी, नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात सुरु आहेत. परंतु अजूनपावेतो मोठी कारवाई कधीच झाली नाही. ही कारवाई का होत नाही. यात अर्थकारण दडले आहे काय? याचा शोध घेण्याची गरज आहे. तुमसर वनविभागांतर्गत पचारा जंगलात अवैध मोहफुल दारु गाळप केंद्रावर धाड मारून लाकडांचा साठा जप्त केला. अवैध दारु गाळप करणारे आमच्या रडारवर आहेत. ही माहिती सध्या गोपनीय ठेवण्यात आली.- अरविंद मुंढे (भावसे)परिविक्षाधीन उपवनसंरक्षक, तुमसर.
पचारा जंगलात दारु गाळप केंद्र उद्ध्वस्त
By admin | Updated: November 10, 2015 00:42 IST