भंडारा : स्वस्त धान्य दुकान पुर्ववत मिळवून देण्याकरिता आवश्यक असलेल्या शिफारस पत्राची प्रत देण्यासाठी सरपंचाने २० हजार रुपयांची लाच मागितली. यात सापळा रचून लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कोथुर्णा येथील सरपंचासह एका इसमाला आज रंगेहात पकडण्यात आले. दिलीप रतीराम गायधने, सरपंच कोथुर्णा व छगन शिवशंकर चोपकर रा. कोथुर्णा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.माहितीनुसार, कोथुर्णा येथे उषा किशोर नागदेवे यांच्या नावाची स्वस्त धान्य दुकान आहे. तक्रार कर्ता यांच्या बहिनीचे पति नामे किशोर नागदेवे हे पंधरा वर्षांपूर्वी सिकलसेल आजाराने मरण पावले. विधवा बहिण व लहान मुलगी असल्याने स्वस्त धान्य दुकान सांभाळणारे कुणीही नव्हते. म्हणून उषा नागदेवे यांनी दुकान चालविण्याचे संबंधीचे अधिकार पत्र त्यांच्या भावाच्या नावे करुन दिले. दुकान सुरळीत सुरु असताना कोथुर्णा येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नवलकिशोर लांजेवार व सरपंच राजेंद्र लांजेवार यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाने फेब्रुवारी २०१५ पासून सदर दुकान खैरी येथील रहिवासी मारबते यांच्या नावे असलेल्या स्वस्त धान्य दुकानाशी जोडून दिले. सदर राशन दुकान परत मिळविण्याकरिता १३ एप्रिल २०१५ रोजी उषा नागदेवे तहसीलदार भंडारा यांच्याकडे अर्ज सादर केला. या संदर्भात नायब तहसिलदार कातखेडे यांनी दुकान परत मिळण्यासंदर्भात सरपंच व तमुस अध्यक्ष्यांची तक्रार असल्याने राशन दुकान देता येणार नाही असे सांगितले व शिफारस पत्र घेवून आल्यास त्यावर विचार करण्यात येईल, अशी तोंडी सुचना केली. त्यानुसार नवलकुमार लांजेवार यांनी उषा नागदेवे यांना स्वस्त धान्य व केरोशीन दुकानाचा हिशोब देत चला अन्यथा प्रति महिना एक हजार रुपये दयावे लागतील असे सांगितले. यासंदर्भात नागदेवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार दिली. तसेच आज दिनांक ७ मे रोजी सरपंच दिलीप गायधने यांच्याकडे शिफारस पत्र मागितले असता त्यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली. याची तक्रार त्यांनी एसीबीकडे नोंदविली. दरम्यान आज सापडा रचून सरपंच दिलीप गायधने यांना २० हजार रुपयांची रक्कम स्विकारल्यावर त्यानी ही रक्कम छगन चोपकर यांच्याकडे दिली. याचवेळी दोघांनाही पकडण्यात आले. या कारवाईत प्रशांत कोलवाडकर पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, जिवन भातकुले, हेंमतकुमार उपाध्याय, बाजीराव चिंधालोरे, युवराज उईके, अशोक लुलेकर आदीनी सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)
लाच घेताना सरपंच जाळयात
By admin | Updated: May 8, 2015 00:39 IST