भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा, चुलबंद, बावनथडी या नद्यांच्या घाटांवर माेठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. मध्यंतरी रेती तस्करीवर आळा घालण्यात आला हाेता. काही रेती घाटांचे लिलावही करण्यात आले. मात्र, गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात काेराेनाचा उद्रेक झाला. दरराेज हजार ते १२०० रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे संपूर्ण प्रशासन काेराेना संसर्ग प्रतिबंधासाठी झटताना दिसत आहे. याच संधीचा फायदा जिल्ह्यातील रेती तस्कर घेत आहेत. तुमसर, माेहाडी, भंडारा, पवनी तालुक्यांतील रेती घाटांवरून अहाेरात्र रेतीची वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे संचारबंदी असताना ही तस्करी खुलेआम सुरू आहे. एकीकडे बांधकाम मजुरांना संचारबंदीत बंधने घातली. मात्र, रेती तस्करीत असणारे मजूर दरराेज नदीपात्रात एकत्र येऊन रेतीचा उपसा करतात. कंत्राटदाराच्या माध्यमातून त्यांना एकत्र आणून रेतीचा उपसा केला जात आहे. जेसीबीच्या माध्यमातून उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. या सर्व प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे.
रेती तस्करी वाढली, महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:36 IST