कोंढा (कोसरा) : वस्तीशाळा शिक्षकांना सेवेत नियमित करण्याचे आदेश १ मार्च २०१४ रोजी काढले तरी तीन महिने झाले भंडारा जिल्ह्यातील २९ तर पवनी तालुक्यातील १२ वस्तीशाळेचे शिक्षकांना नियमित केले नाही. तसेच ३ महिने होऊन देखील त्यांचे वेतन अदा न केल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.राज्य सरकारने २००० व २००१ मध्ये वस्तीशाळा योजना सुरु केली. या वस्तीशाळेत मानधन तत्वावर स्वयंसेवक नियुक्त केले. त्यामध्ये स्त्री स्वयंसेवकाचे प्रमाण जास्त होते. किमान १२ वी उत्तीर्ण स्थानिक उमेदवारांना स्वयंसेवक म्हणून नियुक्ती दिली. केंद्र शासनाने सर्व शिक्षा अभियान कार्यक्रम सुरु केल्यानंतर शिक्षण हमी योजनेमध्ये वस्तीशाळांचे प्राथमिक शाळेत रुपांतर करण्याचे ठरले. तसेच दोन वर्षापेक्षा अधिक सेवा करणाऱ्या स्वयंसेवकांना जि.प. शाळांमध्ये सामावून घेण्याचे ठरले. यासाठी निमशिक्षकांना डी.एड. करण्याची संधी देण्यात आली. शासनाने निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षकाची वेतनश्रेणी ५२०० - २०२०० ग्रेड वेतन २८०० देण्यात यावे असे आदेश काढले. १४ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर वस्तीशाळा शिक्षकांना शासनाने न्याय दिला. हा निर्णय भंडारा जिल्ह्यातील २९ शिक्षकांना लागू झाला. पण १ मार्च २०१४ पासून लागू केला. पण अजूनपर्यंत त्यांना सेवेत कायम केल्याचा नियुक्ती आदेश मिळाला नाही. तसेच तीन महिन्यापासून वस्तीशाळाशिक्षकांचे वेतन झाले नाही. पवनी तालुक्यात चुऱ्हाड (कोसरा), पालोरा (चौ.), आबादी, रुयाळ, केसलापुरीे, गरडापार, गोंडी, शिमनाळा, चांदीचनेवाडा, नांदीखेडा, सायतानगर (अड्याळ), कोटलपार, महालगाव, खांबाडी (बोरगाव) अशा १२ गावात वस्तीशाळा आहेत. तिथे शिक्षक म्हणून मागील १४ वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांचे ३० महिन्यांचे उपासमारीची पाळी आली आहे. सेवेत कायम करण्यासाठी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी, भंडारा यांनी त्यांना नियुक्ती आदेश देण्याची गरज आहे. हे न मिळाल्याने त्यांच्या वेतनाचा प्रश्न निंकाली निघू शकला नाही. तरी वस्तीशाळा शिक्षकांना नियुक्ती आदेश देऊन त्याचे मागील तीन महिन्याचे वेतन देण्याची मागणी निमशिक्षकांनी केली आहे. (वार्ताहर)
वस्तीशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन अडले
By admin | Updated: July 19, 2014 23:45 IST