भंडारा : विविध मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी ग्रामीण डाक सेवकांनी संप पुकारला आहे. आज ग्रामीण डाकसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून डाक विभागाचा निषेध नोंदविला. दरम्यान दहाव्या दिवशी संपाचा तिढा न सुटल्याने डाक कार्यालयातील पूर्ण व्यवहार ठप्प पडलेला आहे. जिल्ह्यातील २७० ग्रामीण डाकसेवकांनी मागील दहा दिवसांपासून हा संप पुकारला आहे. ग्रामीण डाकसेवकांना केंद्रीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सातव्या वेतन आयोगाचा लाभ द्यावा, आठ तासांचे काम द्यावे, डाकसेवकांच्या मृतकांना अनुकंपावर नियुक्त करावे, सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी, खात्यातील कर्मचाऱ्यांप्रमाणे पदोन्नती वेतन द्यावे या मागण्यांसाठी ग्रामीण डाकसेवकांचा मागील अनेक वर्षांपासून डाक विभागाशी लढा सुरु आहे. नागपूर ग्रामीण विभागातील ११५० ग्रामीण डाकसेवक या संपात सहभागी झाले आहेत. भंडारा विभागातील १२० शाखा डाकपाल व १५० पोस्टमनचा या संपात समावेश आहे. नऊ दिवस लोटूनही त्यांच्या मागण्यांचा तिढा कायम आहे. बुधवारी दुपारी जिल्ह्यातील ग्रामीण डाकसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शास्त्री चौकातून काढलेला हा मोर्चा त्रिमूर्ती चौकात पोहचला. यावेळी डाक विभागाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाने योग्य भूमिका वठविली. हा मोर्चा अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या नेतृत्वात काढण्यात आला होता. (शहर प्रतिनिधी)
ग्रामीण डाक सेवकांचा मोर्चा
By admin | Updated: March 19, 2015 00:34 IST