भंडारा येथील घटना : उत्पादन शुल्क विभागाची कारवाईभंडारा : नवीन वर्षाच्या निमित्ताने विक्री करण्याच्या उद्देशाने बनावट विदेशी मद्य विकण्याच्या तयारीत असलेल्या एका ३० वर्षीय इसमाला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत ४० हजार ७५६ रुपयांचे दारु व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने भंडारा शहरातील राजगुरु वॉर्डातील एका घरामध्ये केली. महेश मनोहर निनावे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशान्वये बनावट देशी - विदेशी मद्य व परराज्यातील दारु विक्री उत्पादनाविरुद्ध विशेष धडक मोहीम राबविण्याचे निर्देश निर्गमीत केले आहे. त्यानिमित्ताने भंडारा जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वात निरीक्षक राहुल अंभोरे यांनी आज शहरातील राजगुरु वॉर्ड, छोटा बाजार परिसरातील एका संशयीत घरावर धाड घातली. यात मध्य प्रदेश राज्यात निर्मित व तेथेच विक्रीस असलेली सिल्वर जेट व्हीस्की व त्यापासून महाराष्ट्रातील नामांकीत ब्राँडच्या विदेशी मद्याच्या रिकाम्या बॉटलांमध्ये मद्य भरून ते विकण्यासाठी नेण्यात येणार होते. यात बनावट झाकणे, बॉटल, लेबल व दारु असा एकूण ४० हजार ७५६ रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. महेश निनावे याला महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. ही कारवाइ निरीक्षक राहुल अंभोरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक ए.एच. कोटांगले, शिपाई जे.ए. अंबुले यांनी केली. (प्रतिनिधी)