चिचखेडा येथील प्रकार : हजेरी पत्रकात मोहाडीतील नागरिकांचे नावे मोहाडी : तालुक्यातील चिचखेडा ग्रामपंचायती अंतर्गत २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या स्मशानभूमी सपाटीकरणाच्या कामावरील हजेरी पत्रकात मोहाडी येथे वास्तव्यास असलेले, नागपूरला गेलेले, सनफ्लॅग कंपनीत काम करणाऱ्या लोकांचे बोगस नावे टाकुन गरीबांच्या हिस्स्याचा पैसा रोजगार सेवकाने हडपल्याचा आरोप सोमेश्वर बोंदरेसह काही गावकऱ्यांनी बिडीओ यांना दिलेल्या तक्रारीद्वारे केला असुन या संपुर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.गावातील कष्टकरी, भूमिहीन मजुरांसाठी शासनाने रोजगार गारंटी योजना सुरु केली. या योजनेद्वारे गावातील मजुरांना उन्हाळ्यात कमीत कमी १०० दिवसाचा रोजगार उपलब्ध करुन दिला. तसेच या योजनेद्वारे शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होतात. मात्र खरोखरच या योजनेचा संपुर्ण पैसा मजुरासाठीच खर्च करण्यात येतो का, याकडे मात्र प्रशासनाचे लक्ष राहलेले नसल्याने रोहयो योजनेत दिवसेंदिवस भ्रष्टाचार फोफावत आहे. दररोज रोहयो कामावरील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येत असताना सुध्दा थातुर-मातुर चौकशी करुन भ्रष्टाचारांना रानमोकळे करुन देण्यात येत आहे. चिचखेडे येथे यावर्षी स्मशानभूमी सपाटी करणाचे काम रोहयोंतर्गत करण्यात आले. या कामावरील हजरेी पटात मोहाडी येथे वास्तव्यास असलेले एक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील तीन व्यक्तींची नावे आहेत. विशेष म्हणजे हे कुटुंब सधन असून त्यांच्याकडील शेतीवर मजूर आहेत. ते ते कुटुंब रोहयो कामावर मजुरीसाठी जातील का हे विचार करने योग्य गोष्ट आहे. नागपूर येथे एका कंपनीत काम करणारा, सनफलॅग कपनी वरठी येथे काम करणारा, लग्न होऊन सासुरवाडीला गेलेल्या मुलीचा व खुद तक्रारकर्ता याचे नाव त्या हजेरीपटात दर्शविण्यात आलेले आहे. तक्रारकर्ता याने हे हजेरीपट इंटरनेटवरुन बघून त्याची प्रत काढली तेव्हा हे बिंग फुटले. व कामावर न जाताही त्याचे स्वत:चे नाव बघून तोही चक्रावला. याबाबत, झालेल्या ग्रामसभेत प्रश्न विचारला असता रोजगार सेवक नरेश बोंदरे याने तक्रारकर्ता सोमेश्वर बोंदरे याला शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली व तुम्ही कोठेही तक्रार करा, माझी वरपर्यंत सेटींग आहे, माझे कोणी काही बिघडवू शकत नाही असे अरेरावीचे उत्तर दिले असे तक्रार कर्त्याचे म्हणणे आहे. एकनाथ गाढवे, श्रीराम गाढवे, सुनंदा गाढवे हे मोहाडी येथे वास्तव्यास असून ते सधन कुटुंब आहेत. श्रीराम गाढवे हे रापनी मधून नुकतेच वाहक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. रोशन वाढई हा नागपुरच्या एका कंपनीत काम करतो तर देवदास बोंदरे हा सनफ्लॅग वरठी येथे काम करतो तक्रारकर्ता सोमेश्वर बोंदरे हा कामावर गेलाच नाही तरी वरील सर्व लोकांचे त्या हजेरीपटावर नावे आहेत. (शहर प्रतिनिधी)मग्रारोहयोच्या कामाच्या हजेरीपटाशी आमचा काही संबंध नसतो. हजेरीपट बघीतल्यानंतरच या विषयावर काही भाष्य करता येईल.- गणपतराव लांजेवार, ग्रामसेवक, चिचखेडा ग्रामपंचायतस्मशानभूमी सपाटीकरणाचे काम झाल्याने गाव सुंदर झाले. मजुरातर्फे तेथील मोठा खड्डा बुजविता आला नसता. त्यामुळे तो काम यंत्राद्वारे करण्यात येवून काही लोकांचे नाव मस्टर मध्ये घालण्यात आले, असे काम सर्वच ठिकाणी होतात. विहीरीचे कामे सुद्धा याच पद्धतीने झाले. त्यामुळे यात कोणताच भ्रष्टाचार नाही. विकास हाच हेतु होता.- परसराम गाढवे, सरपंच, ग्रामपंचायत चिचखेडा.
रोहयो कामात भ्रष्टाचार
By admin | Updated: September 2, 2015 00:26 IST