भंडारा : खाजगी शाळेच्या बांधकामासाठी आणलेली रेती रस्त्यावर ठेवण्यात आल्याने रहदारीला त्रास होत आहे. हा प्रकार तकीया वॉर्डातील बाबानगर परिसरातील आहे. यासंदर्भात पराग कडव यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली आहे.तकिया वॉर्डातील बाबानगरातील कडव यांच्या घरासमोर असलेल्या रस्त्यावर व नालीवर बांधकाम साहित्य घालण्यात आले आहे. परिणामी कडव यांच्या घरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीची दुरवस्था झाली आहे. खाजगी खर्चाने त्यांनी तात्पुरती नालीची दुरूस्ती केली. तसेच संबंधितांना रस्त्यावरील साहित्य व्यवस्थीतपणे ठेवण्याची विनंती केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.शाळा, नर्सिंग होम व रहिवासी घर असल्याने व र स्त्यावर बांधकाम साहित्य ठेवल्याने सर्वांचीच रहदारीसाठी कोंडी होत आहे. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी कडव यांनी जिल्हाधिकारी, नगरपालिकेचे अध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)
रस्त्यावर रेती, रहदारीला अडथळा
By admin | Updated: June 9, 2016 00:47 IST