शेतकरी आत्महत्या : जिल्हा सामान्य रुग्णालयात काहीकाळ तणावाची स्थितीजवाहरनगर : प्रकल्पासाठी संपादित केलेली शेतजमिन व घराचा मोबदला न मिळाल्याने पिपरी येथील रघुनाथ कारेमोरे या शेतकऱ्याने सोमवारला आत्महत्या केली. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी जमिन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला तातडीने द्या, अन्यथा शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे आज मंगळवारला सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. कारेमारे यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून खिशात ठेवली होती. त्यात त्यांनी संपादीत जमिनीचा मोबदला न मिळाल्याने आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले होते. त्यानंतर तहसीलदार घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही. अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. आज मंगळवारला उत्तरीय तपासणी मृतदेह सामान्य रूग्णालयात आणला असता ग्रामस्थांनी संपादित जमिनीचे पैसे द्या, ही मागणी लावून धरली. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती होती. दरम्यान आमदार चरण वाघमारे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, सभापती नरेश डहारे, शिवसेनचे संजय रेहपाडे, यशवंत सोनकुसरे, अनिल गायधने, जिल्हाधिकारी धीरजकुमार उपविभागीय अधिकारी संपत खिल्लारी, तहसीलदार सुशांत बनसोडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन ग्रामस्थांचे म्हणने ऐकून घेतले. परंतु ग्रामस्थ संतप्त होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ६४ प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात येईल, असे आश्वासना दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह पिपरीला हलविण्याची तयारी केली. त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार पिपरीत पोहोचले. पिपरी येथील गोसे धरणात गेलेल्या शेतजमिनीचा पैसा मिळाला. परंतु गावातील ६४ नागरिकांना २.९० च्या पॅकेजनुसार पैसे मिळाले नाही. काहीचे पॅकेजच्या यादीत नाव नाही. त्यातूनच नैराश्येतून कारेमोरे यांनी आत्महत्या केली असून याला राज्य शासन व जिल्हा प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)
आधी मोबदला द्या नंतरच मृतदेह उचला
By admin | Updated: December 9, 2015 00:44 IST