भंडारा : महाराष्ट्रात जातीय अत्याचाराला प्रतिबंध घालणार व मागासवर्गीयावर यापुढे अन्याय-अत्याचार होऊ देणार नाही, जवखेडा येथील दलित हत्याकांडातील आरोपींना २४ तासात अटक होणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य अध्यक्ष अरुण गाडे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी कास्ट्राईबच्या शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन सोपविल्यानंतर ते बोलत होते.निवेदनात जवखेडा येथील दलित हत्याकांडातील आरोपींना तत्काळ अटक करणे, जातीय अत्याचार रोखण्यासाठी अॅक्ट्रासिटी अॅक्ट कायदा लागू करणे, जातीय अत्याचार रोखण्यासाठी अॅक्ट्रासिटी अॅक्टऐवजी प्रीव्हेन्सन आॅफ टेरिरीझम अॅक्ट कायदा लागू करणे, मागासवर्गीयांचा नोकरीतील संपूर्ण १ लाख २० हजार अनुशेष भरुन काढणे, कामगार/ कर्मचारी यांची कंत्राटी पध्दती ही शोषणाची पध्दत बंद करुन सर्वांना सेवेत कायम करणे. बौध्दांना केंद्र शासनाच्या सवलती लागू करण्यासाठी बौध्दांचा अनुसूचित यादी समावेश करणे, नागपूर सुधार प्रन्याय येथील कार्यरत कर्मचाऱ्यांना ना नफा ना तोटा या धर्तीवर भूखंड उपलब्ध करुन देणे. महाराष्ट्रातील मागासवर्गीय सनदी अधिकाऱ्यांना महत्वाच्या विभागावर नियुक्ती देणे, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना सेवेत कायम करणे. आरोग्य संचालनालय, शिक्षण व उच्चतंत्र विभाग संचालनालय, कृषि संचालनालय, सामाजिक न्याय विभाग संचालनालय, वैद्यकिय शिक्षण संचलनालय, नागपुर येथे स्थलांतरित करणे आदी मागण्याचा समावेश होता.कास्ट्राईब महासंघाचे कार्य माझे परिचयाचेच असून अन्यायाविरुध्द लढणारी ही एकमेव संघटना आहे. या महासंघाच्या कार्यात मी सदैव सोबत असणार असे प्रतिपादन करुन एका महिन्याचे आत मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष अरुण गाडे, भैय्यासाहेब शेलारे, विनेश शेवाळे, उपमहासचिव सूर्यकांत हुमणे, विभागीय सहसचिव जगदीश सुखदेवे, जिल्हाध्यक्ष शेखर बोरकर, उपाध्यक्ष प्राचार्य अनमोल देशपांडे, जिल्हा सचिव राजकुमार मेश्राम, केंद्रीय संघटन सचिव शैलेंद्र जांभूळकर, संघटन सचिव विनय सुदामे, प्रसिध्दी प्रमुख सैनपाल वासनिक यांचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)
कास्ट्राईब महासंघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By admin | Updated: November 15, 2014 22:42 IST