भंडारा : जिल्ह्यात नव्यानेच अस्तित्वात आलेल्या न्यु नागझिरा व उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी असल्यामुळे येथील गावकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातच वन विभागाच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना शेतीचे कामे करण्यात अडचण निर्माण होत आहे.जिल्ह्यात न्यु नागझिरा हे अभयारण्य नव्याने अस्तित्वात आले. त्याचप्रमाणे पवनी तालुक्यातील काही जंगलाचा भाग उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात गेला आहे. कोका जंगलाचा परिसर पुर्वीपासून जंगलव्याप्त असून यापूर्वी तो वन विकास महामंडळाकडे होता. आता हा भाग अभयारण्यात आला असून वन्यजीव विभागाच्या अधिकारकक्षेत आहे. अभयारण्यातून वनोपज आणण्यास मनाई असल्यामुळे साकोली, लाखनी, भंडारा व मोहाडी तालुक्यातील दीड डझन गावातील नागरिक त्यांच्या पत्रावळी तयार करणे, मध गोळा करणे, डिंक व लाख उत्पादन घेणे असे व्यवसाय करू शकत नाहीत. लोकांना त्यांचा अनेक पिढ्यांपासून सुरू असलेला परंपरागत व्यवसाय बंद करावा लागला. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीचा सामना करण्याची वेळ आली आहे. गावांच्या जवळपर्यंत हिंस्त्र प्राण्यांचा शिरकाव झाल्यामुळे शेतात काम करणारेही शेतकरी व मजुरांसाठी असुरक्षित झाले आहे.शेतातील पिकांचे तृणभक्षी प्राणी नुकसान करतात. याबाबत शेतकऱ्यांनी प्रतिबंधासाठी कारवाईचा ससेमिरा सोसावा लागत आहे. पवनी तालुक्यातील ढोरप येथे काही महिन्यापुर्वी घरात बिबट्या शिरला होता. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या अभयारण्याच्या हद्दीतील गावातील शेतकरी व नागरिकांचा व्यवसाय व शेती कसणे अशक्य होत आहे.अद्याप संबंधित गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीच आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अभयारण्यातील वन्यजीवांची संख्या वाढणे चांगली बाब आहे. परंतु, त्यामुळे नागरी वस्त्यांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाखनी तालुक्यातील गावांमध्ये बछड्यांसह वाघिणीची उपस्थिती होती. त्या भागात शेतात जाण्यास बरेच दिवसपर्यंत मजूर तयार नव्हते. हीच बाब साकोली तालुक्यातील उसगाव, चांदोरी या गावांत आहे. (नगर प्रतिनिधी)
न्यू नागझिरा अभयारण्यांतर्गत पुनर्वसनाचे काम रखडले
By admin | Updated: October 30, 2014 22:48 IST