मोहाडी : भंडारा जिल्ह्यातील नदीपात्रातून रेती काढण्यासाठी झालेल्या लिलावास उच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे स्थगिती दिल्याने आता पुन्हा सर्वच रेतीघाट बंद करण्यात आलेले आहेत. मात्र रेतीची आवश्यकता असल्याने आता रेती चोरांचे फावले आहे. रेती चोरीवर महसुल विभाग व पोलीस कशाप्रकारे अंकुश लावते आता याकडे लक्ष लागले आहे. मोहाडी तालुक्यातील लहान मोठे २५ रेतीघाटापैकी यावर्षी फक्त ६ रेतीघाटाचे लिलाव झाले होते. या नेती घाटातून धडाक्यात रेती काढण्याचे काम सुरु होते. रेती उपसा करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंतच असल्याने व मधल्या काळात पावसाळा येत असल्याने लिलाव घेणारे लवकरात लवकर रेतीचा उपसा करण्यासाठी प्रयत्नशिल होेते. अधिकाधिक प्रमाणात रेतीचा उपसा करुन जास्त प्रमाणात नफा कमविण्याच्या उद्देशाने प्रत्येक ट्रकमध्ये मर्यादेपेक्षा जास्त रेती भरुन वाहतूक सुरू होती. मात्र अशातच उच्च न्यायालय नागपूरतर्फे रेतीघाटातून रेती काढण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचा आदेश येऊन धडकला. त्यामुळे १३ मे पासून भंडारा जिल्ह्यातील सर्वच रेतीघाटातून रेती काढण्यावर बंदी घालण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
रेती उपस्यावर पुन्हा बंदी
By admin | Updated: May 18, 2014 23:22 IST