भंडारा : कधी नव्हे एवढ्या कमी पावसाची यावर्षी नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती. आतापर्यंत १६० मि.मी. पावसाची आवश्यकता असताना यावर्षी केवळ २९ टक्के पाऊस झाला आहे. जलाशयात केवळ १९.५६ टक्के जलसाठा असून ४ मध्यम प्रकल्पात १४.८५ टक्के, ३१ लघु प्रकल्पात ४२.८८ टक्के, २८ मामा तलावात ४३.७१ टक्के जलसाठा आहे. दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.दुष्काळाचे सावटभंडारा जिल्ह्यात यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. परिणामी खरीपाचे पीक संकटात सापडले आहे. मागीलवर्षी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीचा सामना केल्यानंतर झाले गेले दु:ख विसरुन यावर्षी जोमाने कामाला लागला होता. महागडे बियाणे घेऊन पेरणी केली, परंतु निसर्ग दगा देत आहे. दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. हंगाम लांबत आहे. त्यामुळे उत्त्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी यावेळी ४० ते ५० टक्के रोवणी होते. परंतु पऱ्हेच नाहीतर रोवणीचा प्रश्नच उद्भवत नाही. जलाशयाची स्थिती भीषणभंडारा जिल्ह्यात चार मध्यम, ३१ लघु आणि २८ माजी मालगुजारी असे एकूण ६३ तलाव असले तरी एकही प्रकल्प शंभर टक्के भरलेला नाही. गोसीखुर्द आणि बावनथडी प्रकल्पात पर्याप्त जलसाठा असला तरी पेरणी आणि रोवणीसाठी मिळत असला तरी चिखलासाठी आवश्यक पाणी मिळत नाही. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पाऊस २९ %, जलसाठा १९ %, रोवणी शून्य
By admin | Updated: July 9, 2014 23:16 IST