पालांदुरात टिनपत्रे उडाली : रबी पिकांना धोकाभंडारा : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. यात शेतातील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. आज सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.उन्हाळ्याची चाहूल लागली असतांनाच वातावरणात बदल झाला आहे. शेतातील कापणी योग्य पिके घरी नेण्याचा बेतात असलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. दोन दिवसापुर्वी जिल्ह्यातील काही ठिकाणी अचानक पावसाने काहूर घातला. यामुळे हातातोंडाशी आलेला शेतातील पिकांचा घास हिरावल्याची स्थिती निर्माण झाली. दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने ढगाळ वातावरण आहे. पाऊस व वातावरण बदलामुळे रब्बी पिकांसह पालेभाज्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. सोमवारला सकाळपासून सुर्यप्रकाश पडला होता. मात्र सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन सोसाटाच्या वादळासह पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. पालांदूर : सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाने हजेरी लावली. पाऊस जोराचा नसला तरी वादळामुळे मोठे नुकसान झाले. येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एका खाजगी दुकान गाडे मालकांचा दुकानासमोर लावलेले टिनपत्रे उडाली. यात दुकानमालकाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. अर्धा तास पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांना फटका बसला आहे.करडी(पालोरा) : करडी, पालोरा, मुंढरी, देव्हाडा परिसराला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले. दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळदार पाऊस झाला. आज सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. अवकाळी पावसामुळे शेतीची कामे खोळंबली. भाजीपाला पिकांबरोबर रबी पिकाचे नुकसान झाले. विटभट्टी मालकांना फटका बसला. सुमारे पाऊन तास विज पुरवठा बंद पडल्याने उद्योजक व व्यावसायीकांना सुध्दा अवकाळी पावसाने झटका दिला.(लोकमत चमू)
वादळासह पावसाची हजेरी
By admin | Updated: March 1, 2016 00:18 IST