तुमसर : शेतकऱ्यांना अल्प व्याजदरात राष्ट्रीयकृत व सहकारी बँकातून पीक कर्ज देण्यात येते, परंतु पीक कर्ज घेण्याकरिता खोटे सातबारा सादर करणे तथा शेती वाढवून पीक कर्ज काढून देणारे एक रॅकेट येथे सक्रिय आहे. राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँकातून या रॅकेटनी अनेकांना पीक कर्ज मिळवून दिल्याची चर्चा शहरात आहे.शेकडो शेतकरी दरवर्षी पीक कर्ज राष्ट्रीयकृत बँका तथा सहकारी बँकातून काढतात. याकरिता शेतकऱ्यांना बँक प्रशासनाकडे सातबारा सादर करावा लागतो. अनेक शेतकरी नियमाप्रमाणेच सातबारा सादर करतात. परंतु पीक कर्ज काढून देणारी एक रॅकेट येथे सक्रीय असल्याची माहिती आहे. खोटे सातबारा सादर करणे तथा सातबारा वर जमिन वाढवून दखविणे असा गोरखधंदा या रॅकेटचा आहे. शहरात राष्ट्रीयकृत बँका १४ असून १० ते १२ सहकारी बँका आहेत. बहुतेक बँकातून या रॅकेटने पीक कर्ज प्राप्त केले आहे. सध्या बँकानी शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे बंद केले आहे.या प्रकरणात बँक प्रशासन कारवाई करण्यास धजावत नाही. कर्जाची रक्कम कशी काढता येईल. यावरच बँकाचे लक्ष आहे. पीक कर्ज मंजूर करतांनी बँकाचे पथक प्रत्यक्ष गावात जाऊन शेतीची पाहणी करतो, परंतु किती शेती असेल याचा अंदाज या पथकाला येत नाही.३ ते ४ टक्के दराने किमान एक लक्ष कर्जाची मर्यादा आहे. शासन पिक कर्ज माफ करीत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक कर्ज काढतात. या संधीचा फायदा हे रॅकेट घेत आहे. तुमसर शहरापासून जवळच्या गावात हे रॅकेट सक्रीय आहे. शहरात या प्रकाराची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घातल्याने बँक कर्मचारी सध्या सतर्क झाल्याची माहिती आहे. बँकेत पीक कर्ज प्रकरणे अत्यंत बारकाईने हाताळली जात आहेत. यासंदर्भात बँकेचे प्रतिनिधी मात्र बोलणे टाळत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
पीककर्ज उपलब्ध करुन देणारे रॅकेट सक्रिय
By admin | Updated: April 24, 2015 00:28 IST