भंडारा : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या समस्या तसेच नागपूर विभागातील आगामी शिक्षक आमदार निवडणुकीचे उमेदवार यांचे प्रचारार्थ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, भंडाराची प्रांतीय आढावा बैठक आदर्श विद्यालय दवडीपार येथे माजी शिक्षक आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे रोज नवे अध्यादेश काढून संघटनांच्या विरोधानंतर आपलेच निर्णय रद्द करण्याची नामुष्की शासनावर आली आहे. सभागृहात शिक्षकांचे प्रश्न लावून धरणारी बुलंद आवाज नाही. त्यामुळे मराठी शाळा व शिक्षकांची अस्मिता कायम टिकवून ठेवायची असेल तर पुढील शिक्षक आमदार विमाशिचा असल्याशिवाय तरणोपाय नाही, असे माजी शिक्षक आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांनी शिक्षकांना संबोधित केले.
राज्यातील संच निर्धारणाच्या चुकीच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरले असून १०० च्या खाली पटसंख्या असणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापकानांही अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे.
शिक्षकविरोधी निघणारे रोजचे शासन परिपत्रक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या चौकटीत बसत नसल्याने कोणतेही आदेश न्यायालयात टिकत नाही.त्यामुळे संघटनेच्या लढ्या पुढे आपलेच निर्णय रद्द करण्याची शासनावर नामुष्की आली आहे. प्राथमिक शिक्षकांना त्यांचे इच्छेविरुध्द शाळाबाह्य कामे न देण्याचे कोर्टाचे आदेश असतानादेखील शासकीय हातखंडे वापरून बळजबरीने शाळाबाह्य कामे दिली जातात. याप्रसंगी सुधाकर अडबाले, अजय लोंढे, प्रा. होमराज कापगते, श्रीधर खेडीकर, भंडाराचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर रांहागडाले, पुरुषोत्तम लांजेवार, भीष्म टेंभूर्णे, टेकचंद मारबते, के. आर. ठवरे, भाऊराव वंजारी, अर्चना भोयर, छाया वैद्य, कांता कामथे, समशाद सय्यद, जागेश्वर मेश्राम, दिनकर ढेंगे, मनोज अंबादे, श्याम घावड, मोरेश्वर वझाडे, अनिल कापटे, इत्यादी शिक्षक तसेच तालुक्यातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी तर संघटन शक्तीचा आढावा जिल्हाकार्यवाह राजेश धुर्वे यांनी सादर केला. संचालन अनंत जायभाये यांनी तर धीरज बांते यांनी आभार मानले.