तुमसर : तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी तथा त्यांचे अधिनस्थ कर्मचारी मुख्यालयी न राहता शहरात राहून जंगलाचे संरक्षण करीत आहेत. शहरात राहून जंगलाचे रक्षण करणारे हे एकमेव वनपरिक्षेत्र राज्यातील असावे. भंडारा येथे जिल्हयाचे मुख्यालय आहे. राज्य शासनाला मुख्यालयी राहण्याचा अहवाल त्यांच्याकडून निश्चितच पाठविला जात असावा. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.सन २००७ मध्ये लेंडेझरी वनपरिक्षेत्र तयार करण्यात आले होते. तुमसर मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावरील संरक्षित तथा राखीव जंगलाची सुरक्षा करण्यास अडचण निर्माण होत होती. मध्यप्रदेश व नागपूर जिल्हयाच्या सीमा येथे मिळाल्या आहेत. वनतस्करांची या जंगलात घुसपैठ होती. सागवन जंगल येथे आहे. काही महिन्यापूर्वी या जंगलातून सावधन वृक्षांची तस्करी बालाघाट येथे झाल्याची माहिती आहे. एक महिन्यापूर्वी लेंडेझरी वनविश्रामगृहात मुख्य वनसंरक्षक जी. आर. टेंभुर्णीकर आले होते. त्यांनी कार्यशाळा घेण्याचे आदेश येथे अधिकाऱ्यांना दिले होते. या जंगलात रात्रीला अवैध कामे होतात. उन्हाळ्यात हे जंगल सुरक्षित राहत नाही. चिखली कम्पार्टमेंटमध्ये मौल्यवान सागवन झाडे आहेत. त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह आहे. महाराष्ट्र शासनाने काही महिन्यापूर्वी वनजैव वन्यप्राणी प्रगणना अंतर्गत एकूण १२ ट्रॅप कॅमेरे या जंगलात लावले होते. सध्या एकच कॅमेरा बावनथडी मुख्य कालव्याच्या जवळ लेंडेझरी-बघेडा मार्गावर आहे. उर्वरित कॅमेरे काढण्यात आले. संबंधित एनजीओकडे ती सुपूर्द करण्यात आल्याचे समजते. या जंगलात काही महिन्यापूर्वी बंदूकधारी सशस्त्र टोळी आढल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. सशस्त्र बंदूकधारी नेमके कोण आहेत. याची माहिती नाही.जंगल परीसरात मांडवी रिठी येथे अवैध मद्य गाळप केंद्र सुरु आहे. मद्य निर्मिती टोळी मध्यप्रदेशातील असल्याची माहिती आहे. लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील मद्यनिर्मिती करण्याकरिता जंगलातील वृक्षांचा सर्रास येथे वापर करण्यात येते. मध्य प्रदेश तथा महाराष्ट्रातील सीमावर्ती गावात हा मद्याचा साठा विक्री केला जातो.या प्रकाराची एक तर माहिती लेंडेझरी येथील वनखात्याला नसेल अथवा त्यांचे अर्थसंबंध येथे निश्चितच आहे. मद्यनिर्मिती केंद्राचे स्थळ नेहमी स्थलांतरित होते. लेंडेझरी वनपरिक्षेत्रात नागझिरा जंगलातील राष्ट्रपती वाघाची शिकार करणाऱ्या कट्टू पारधी याने ही बावनथडी मुख्य कालवा परिसरात आपला ठिय्या होता असे बयानात नमूद केले होते. १५ दिवसांपूर्वी सीबीआयचे पथक त्याला या जंगलात घेऊन आले होते. नियमावर बोट ठेवणाऱ्या वनविभागाने येथे चौकशी करुन कारवाई करण्याची गरज आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीनीही लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
शहरात राहून जंगलाचे संरक्षण
By admin | Updated: March 23, 2015 00:45 IST