तुमसर : कोरोना संक्रमण काळात गत दोन वर्षांपासून लोकल प्रवासी गाड्या बंद आहेत. रेल्वेच्या लोकल गाड्या सुरू करण्याबाबत प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती आहे. परंतु तसे आदेश अजून आले नाहीत. लोकलमुळे गर्दी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकल प्रवासी गाड्यांची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. खबरदारी म्हणून रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्या तत्काळ बंद केल्या होत्या. लोकलने प्रवाशांची मोठी गर्दी वाढून कोरोनाचे संक्रमण वाढू नये, याकरिता खबरदारी म्हणून रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्यानंतर ही लोकल सुरू करण्याचा रेल्वेचा प्रस्ताव नाही. सदर प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. येथे रेल्वे प्रशासनाच्या आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे.
एकीकडे लोकल प्रवासी गाड्या बंद असून एक्स्प्रेस गाड्या सुसाट धावत आहेत. या गाड्यात प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. आरक्षण केल्यानंतरच या एक्स्प्रेस गाड्यातून प्रवाशांना प्रवास करता येते. लहान स्टेशनवरील लोकांना अजूनही लोकल गाड्या सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना लोकल बंद असल्यामुळे एसटीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून वेळही जास्त लागत आहे. तुमसर-तिरोडी आंतरराज्य रेल्वे गाडी मागील दोन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे तुमसर शहरात येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, आर्थिक फटका त्यांना बसला आहे. तुमसर येथील बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे. रेल्वेस्थानकावर सध्या शुकशुकाट दिसून येत आहे. तुमसर रोड रेल्वेस्थानकावर बोटावर मोजण्याइतक्याच एक्स्प्रेस गाड्यांना थांबा आहे. उर्वरित एक्स्प्रेस गाड्या सुसाट धावत आहेत. रेल्वे प्रशासनाने नियोजन करून किमान लोकल गाड्या या मार्गावर सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. मुंबई-हावडा रेल्वे मार्ग हा वर्दळीचा रेल्वे मार्ग आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गावर रेल्वे प्रवासी दररोज प्रवास करतात. अनेक रेल्वेस्थानकावर रेल्वेचे रॅक जागच्या जागी थांबले आहेत रेल्वे कर्मचाऱ्यांना सुद्धा रेल्वे गाड्या नेहमी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.