भंडारा : गोसेखुर्द धरणात बुडीत झालेल्या आणि इतरत्र पुर्नवसीत झालेल्या गावांना भेट देवून जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी गावातील १८ नागरी सुविधांची पाहणी केली. यासंदर्भातील गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घेवून त्या सोडविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.गोसेखुर्द प्रकल्पामध्ये दुसऱ्या टप्प्यात बाधीत झालेल्या सौंदड व खापरी या दोन गावांचे पुर्नवसन चकारा ता. पवनी येथे केले आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील बाधीत मेंढा या गावाचे पुर्नवसन मौजा गोसे बुज येथे करण्यात आले आहे. या दोन्ही पुर्नवसीत गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी सौंदड खापरी येथील गावकऱ्यांनी वीज जोडणी मिळाली नसल्याचे सांगितले. या गावात १७० कुटूंबापैकी ६० कुटूंबांचे स्थलांतरण झाले आहे तर उर्वरित कुटूंबांचे घर बांधकाम सुरू आहे.गोसेबुज गावातील लोकांनी रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जिल्हा उद्योग केंद्राच्या मदतीने पिंजरा मत्स्यपालनासाठी प्रस्ताव द्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना सांगितले. गोसेखुर्द धरणाच्या पाण्यात केवळ बाधीत गावातील मच्छीमार संस्थांनाच मासेमारी करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या सचिवांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिलेत. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी विजया बनकर, तहसिलदार नरेंद्र रांचिलवार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, उपअभियंता भाटिया, मंडळ अधिकारी मदामे, सरपंच व गावकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
प्रकल्पग्रस्तांनाच मासेमारीचा अधिकार मिळावा
By admin | Updated: March 25, 2015 00:43 IST