तुमसर : बी.एस.एन.एल. च्या स्थानांतर प्रक्रियेत घोळ सुरु असून प्रभारी कनिष्ठ दूरसंचार अधिकारी हे तुमसर येथे सध्या तालुका दूरसंचार अधिकाऱ्याचा अतिरिक्त कारभार पाहत आहेत. मागील २५ वर्षापासून भंडारा विभागात एकच अधिकारी सतत कार्यरत असल्याबाबत बी.एस. एन.एल. च्या अधिकाऱ्यात धुसफूस सुरु आहे.बी.एस.एन.एल. च्या अधिकारी कॅडर संघाने दि. २८ आॅक्टोबर २०१० व स्मरणपत्र दि. २२ मे २०१४ रोजी महाप्रबंधक दूरसंचार भंडारा सहाय्यक महाप्रबंधक (प्रशासन) भंडारा तथा जिल्हा दूरसंचार अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या निवेदनात नियमबाह्य कामे व निर्णय कसे घेण्यात आले याकडे लक्ष वेधले आहे.बी.एस.एन.एल. च्या स्थानांतर प्रक्रियेत नियम मोडल्याप्रकरणी अधिकाऱ्यांच्या संघटनेने नियम उल्लंघनाबाबत तक्रार केली आहे. भंडारा येथे कनिष्ठ दूरसंचार अधिकारी जे.एस. टेंभरे यांच्या प्रकरणात बी.एस.एन.एल. ने नियमांचे उल्लंघन केले आहे. बी.एस.एन.एल. अधिकाऱ्यांच्या संघाने व्यवस्थापनाकडे पारदर्शकतेसंदर्भात विचारणा केली असता व्यवस्थापनाने अतिशय सकारात्मक उत्तर दिले. परंतु टेंभरे यांना मात्र सुरक्षितता प्रदान केली. उलट टेंभरे यांची नियुक्ती प्रभारी अधिकारी म्हणून भंडारा ते तिरोडा, तुमसर अशा सोयीच्या ठिकाणी पाठविले.जे.एस. टेंभरे हे प्रभारी कनिष्ठ दूरसंचार अधिकारी नियमित जेटीओ नाहीत. भंडारा विभागात नियमीत जेटीओ तथा एस.डी.ई.एस. कार्यरत आहेत.टेंभरे यांना एसडीसीए या पदावर प्रस्थापित करण्याची गरज आहे. टेंभरे यांना प्रभारी कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदावर ठेवून कंपनी जास्तीचा महसूल खर्च करीत आहे. या घोळामुळे बी.एस.एन.एल. सेवा कोलमळण्याच्या मार्गावर आहे. टेंभरे हे टी.टी.ए. तथा सध्या प्रभारी जेटीओ पदावर कार्यरत असून उपमंडळ अभियंता (समूह) भंडाराचा अतिरिक्त कार्यभार पाहत आहेत. उपमंडळ अभियंत्याचे त्यांनी वित्तीय अधिकाराचा वापर केला आहे. त्यांच्या या वित्तीय अधिकाराला मंडळ अभियंता (अनुरक्षण) भंडारा यांनी मान्यता दिली आहे.अधिकाऱ्यांच्या महासंघाने या सर्व वित्तीय अधिकाराची चौकशीची मागणी केली आहे. एका महत्वपूर्ण बी.एस.एन.एल. कंपनीत असे नियमबाह्य कामे कशी होऊ शकतात. हा संशोधनाचा विषय आहे आणि असे झाले तर विषय गंभीर आहे. अधिकाऱ्यांच्या महासंघाने पुराव्यानिशी जर वरिष्ठांकडे तक्रार केली तरी कारवाई होत नाही. म्हणजेच प्रकरण गंभीर असल्याचे दिसते. (तालुका प्रतिनिधी)
बीएसएनएलच्या स्थानांतरण प्रक्रियेत घोळ
By admin | Updated: July 21, 2014 00:03 IST