अड्याळ : ४० गावांचा भार असलेल्या अड्याळ गावाला उपतालुक्याचा दर्जा प्राप्त असला तरी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे अर्धा विकास बाकी भका अशी अवस्था झाली आहे. जुने विधानसभा मतदार संघ व राजकारण्यांचा बालेकिल्ला असलेल्या अड्याळ गावाला अनेक समस्यांनी ग्रासले असल्यामुळे अड्याळ गावाला कधी येणार अच्छे दिन म्हणून नागरिकांत शासन व्यवस्थेविषयी रोष व्यक्त केल्या जात आहे.२३ वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या फोल आश्वासनाच्या रांगेत उभा असलेल्या अड्याळ तिर्थस्थळाला तालुक्याचा दर्जा मिळाला नाही. येथील नायब तहसील कार्यालय नावापुरतेच आहे. नायब तहसीलदार आठवड्यातून फक्त दोनच दिवस येतात तर कधी येतच नाही. त्यामुळे पवनी येथे जावून आर्थिक व मानसिक मनस्ताप जनतेला करावा लागतो. मागील महिन्यात जिल्हाधिकारी यांनी अड्याळ ग्रामपंचायतला भेट दिली तेव्हा नायब तहसीलदाराचे एक दिवस वाढवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तेही आश्वासन हवेतच विरले. गेल्या आठ महिन्यापासून अड्याळ ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी नाही. आहेत तेही आठवड्यातून दोन दिवसांसाठी कोंढा येथील ग्रामपंचायत व अड्याळ ग्रामपंचयत सांभाळाणी लागते. १७ सदस्य संख्या व १८ हजार लोकसंख्येची धुरा असलेल्या ग्रामपंचायत येथे रेगुलर ग्रामविकास अधिकाऱ्यांची गरज आहे तर तलाठी यांचीसुद्धा बदली झाल्यामुळे तलाठी कार्यालयात तलाठी मानकर यांच्याकडे सुद्धा दोन कार्यालयाचा भार देण्यात आला आहे. येथील समस्या पुढाऱ्यांना दिवसत नसाव्या काय, हाही एक प्रश्न गावकऱ्यांत आहे. मात्र यांचा मनस्ताप गावकऱ्यांना सहन करावा लागतो. येथील ग्रामीण रुग्णालयात मंजूर पदापैकी १० पदे रिक्त असून एकच डॉक्टरच्या भरोष्यावर ग्रामीण रुग्णालयाची धुरा आहे. नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. मात्र रुग्णालयात गेलेल्या रुग्णांना रेफर टु भंडारा असे सांगण्यात येते. प्रभारी अधिकाऱ्यांवर येथील ग्रामीण रुग्णालयाची धुरा आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेल्या भवनाची दैनावस्था झाली आहे. हे भवन झाले तेव्हापासूनच एकही कार्यक्रम झाले नाही. दरवाजे, खिडक्या चोरट्यांनी चोरून नेले आहे. आता तिथे जुगार खेळल्या जातो. येथे खाजगी दोन मंगल कार्यालय आहेत परंतु गरीब सर्वसामान्य नागरिकांना लग्न व इत्यादी कार्यक्रमासाठी २० ते २५ हजार मोजावे लागतात. या सांस्कृतिक भवनाची डागडुजी करून दुरूस्ती केली तर सर्व सामान्य नागरिकांना त्यांचा फायदा होईल. शिक्षणाचे मुख्य केंद्र असल्यामुळे परिसरातील हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात. येथील बसस्थानकावर विद्यार्थी व प्रवाशांसाठी पुरेशा सोई नाहीत. बसस्थानक अतिक्रमाणाच्या विळख्यात आहे. काही व्यावसायीकांनी रस्त्यावरच आपली दुकाने थाटली असून याचा त्रास होतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत अतिक्रमण काढावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)
अड्याळातील समस्या ‘जैसे थे’
By admin | Updated: July 29, 2014 23:40 IST