भंडारा : वैनगंगेच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचे घाण पाणी रोखण्यात यावे, यासह अन्य मागण्यासाठी दि लॉर्ड बुध्दा फाऊंडेशनच्या वतीने येथील त्रिमूर्ती चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना निवेदन पाठविल्यानंतर आंदोलनाची रितसर सांगता करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गोसीखुर्द येथे वैनगंगा नदीवर मोठे धरण बांधले आहे. त्यामध्ये पाणी साठविणे सुरु झाले असल्याने पाणी संचित राहु लागले आहे. नागपुरातून वाहत येणा-या नागनदीचे घाण पाणी आंभोरा घाटावर वैनगंगा नदीत मिसळते आणि ते गोसे धरणात जाते. नागनदी ही नागपुरातून उगम पावली असून घराघरातील सांडपाणी गडरद्वारा निचरा होणारे पाणी त्या नागनदीचे पात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे नागपुरातील विविध केमिकल कंपन्यांचे वेस्टेज विषयुक्त पाणी नाग नदीतून वाहत जाऊन वैनगंगेच्या पाण्यात जमा होत आहे. त्यामुळे गोसे धरणातील जलसाठा दूषित झाला आहे. धरणातील पाणी अडविल्यामुळे गोसेखुर्द पासून सुमारे तीस पस्तीस किलोमिटर भंडारा-कारधापर्यंत वैनगंगा नदी दुधडी पाण्याने भरली राहत आहे. नागनदीचे पाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्यातून दुर्गंधी येत आहे. पाण्याचा रंग हिरवट काळसर झाला आहे. पवनी व भंडारा येथे नगर परिषद द्वारा लोकांना पिण्याचे पाण्याचा पुरवठा वैनगंगा नदीतूनच केला जातो. ग्रामपंचायतीमार्फत याच नदीतील पाणी गावातील लोकांना पिण्यासाठी पुरविले जाते. फिल्टरची खास सोय नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना या दुषित पाण्यापासुन फारच धोका निर्माण झाला आहे. नदी काठावरील गावचे गुरेढोरे, शेळ्या-मेंढ्या नदीतीलच पाणी पितात. पवनी परिसरात कावीळ रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. वैनगंगेचे पाणी दूषित होण्याचे प्रमुख्य कारण म्हणजे नागपूर शहरातून वाहत येणार्या नाग नदीचे घाण व रासायनिक पाणी होय. सबब वैनगंगेच्या पाण्यात नाग नदीचे दूषित घाण पाणी जाऊ न देण्याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण नागरिकांचे आरोग्यास दिवसेंदिवस रोगराईचा धोका निर्माण होत आहे. संपुर्ण नदी पात्रातील साचलेले पाणी दूषित झाल्यामुळे मासोळ्याचे उत्पादनसुध्दा मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे नदी काठावरील ढिवर समाजाचे रोजगारावर गंभीर परिणाम झाला आहे. या बाबीकडे गंभीरपणे लक्ष देवून नाग नदीचे घाण पाणी वैनगंगेच्या पाण्यात जाऊ न देण्यासंबंधाने शासन स्तरावरुन योग्य ती कार्यवाही तातडीने सुरु करावी, नाग नदीचे घाण पाणी वैनगंगा नदीच्या पाण्यात जावू न देता ते पाणी शुध्द करावे किंवा इतरत्र वळवावे अशी मागणी निवेदनात नमूद आहे. शिष्टमंडळात दि लॉर्ड बुध्दा फाउंडेशनचे अध्यक्ष तुलशीराम गेडाम, भिमशंकर गजभिये, अचल मेo्राम आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
दूषित पाणी रोखण्यासाठी धरणे
By admin | Updated: May 12, 2014 23:18 IST