लोहारा : लोहारा तसेच पालांदूर क्षेत्रात धान खरेदी केंद्राअभावी परिसरातील बळीराजा हवालदिल झाला आहे. परिसरात चुलबंद नदीचे खोरे असल्याने पाण्याची पातळी समाधानकारक आहे. यामुळे लोहारा, नरव्हा, पाथरी, मºहेगाव, वाकल, पालांदूर, भागात रब्बी हंगामाच्या धानाची शेती केली जाते. त्यावर शेतकर्यांच्या बर्याच अपेक्षा असतात. खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात धानाची उतारी ही दीडपट असते. यामुळे यावर अवलंबून बळीराजा बरेच धोरण आखत असतो. मात्र निसर्गराजाच्या प्रकापामुळे यंदा त्यातही संकट ओढवले आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणून धान खरेदी केंद्र परिसरात कुठेही सुरू झालेच नाहीत. यात पिचला गेला बळीराजा. कारण शासन मुकदर्शक बनला आहे व व्यापारी ओरबडत आहेत. १०००-१२०० रुपयाचा भाव देऊन व्यापारी संधीचा सोना करीत आहेत. इकडे शेतकरी धान्य खरेदी केंद्राअभावी पडक्या भावात धान विकण्यास विवश आहे. पडक्या भावात धान विकावे लागत असल्याने कास्तकार बांधवांचे अपेक्षीत नियोजनावर विरजण पडत आहे. अपेक्षेपेक्षा कमी रक्कम हाती येणार असल्याने घेणेदेणे, कर्जफेड यावर नक्कीच परिणाम होत आहे. पदोपदी बळीराजा नागविला जात आहे. एवढे सावे प्रत्यक्ष होत असताना जनप्रतिनिधी व स्वत:ला भूमिपूत्र म्हणून घेणारे नेते मात्र गप्प का? हे प्रश्न सर्वांना पडत आहे. शेतकर्यांच्या समस्येकरीता कष्ट घेण्याचे नेतेगण टाळत आहेत. मात्र तेच एखादे कंत्राट मिळवायचे असते तर मात्र आंदोलन-उपोषण नक्की झाले असते, अशी नाराजीव्याप्त चर्चा परिसरातील शेतकर्यांमध्ये आहे. (वार्ताहर)
धान खरेदी केंद्राअभावी बळीराजा हवालदिल
By admin | Updated: May 17, 2014 23:31 IST