अघोषित भारनियमन : नागरिकांमध्ये असंतोषचुल्हाड (सिहोरा) : पंचायत समिती क्षेत्र असलेल्या मोहाडी (खापा) गावात गावकऱ्यांची नवीन विद्युत ट्रान्सफार्मरची जुनी मागणी असताना भोपळाच देण्यात आलेला आहे. या शिवाय मोबाईल टॉवरला मात्र सिंगल फेज विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफार्मर उपलब्ध करण्यात आल्याने असंतोष खदखदत आहे.चुल्हाड चांदपूर मार्गावर अंदाजे १७०० लोकवस्तीच्या मोहाडी (खापा) गावात विजेच्या अघोषित भारनियमनाने गावकरी त्रस्त झाली आहे. पंचायत समिती सदस्य विमल कानतोडे यांचे गृहगावात विजेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या गावात वीज वापर करणाऱ्या ग्राहकांची मोठी संख्या आहे. गावकऱ्यांना सिंगल फेज अंतर्गत विद्युत ट्रान्सफार्मर उपलब्ध करण्यात आले आहे. एकाच विद्युत ट्रान्सफार्मर मधून संपूर्ण गावाला वीज कनेक्शन देण्यात आल्याने वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. दिवसरात्र ही त्रासदायक समस्या असल्याने गावकऱ्यांनी ३ वर्षापासून नवीन सिंगल फेज विद्युत ट्रान्सफार्मर मंजूर करण्याची ओरड सुरु केली आहे. सिहोरा स्थित असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ग्रामसभेचे ठराव तथा पत्र दिली आहेत. परंतु कार्यालयात साहित्य उपलब्ध नसल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे. एकाच विद्युत ट्रान्सफार्मरवर अतिरिक्त दाब वाढत असल्याने वीज पुरवठा खंडीत होत आहे. दरम्यान गावात गेल्या चार महिन्यात मोबाईल कंपनीचे ३ टॉवर उभारण्यात आले आहे. या टॉवरला थेट सिंगल फेज विद्युत ट्रान्सफार्मर देण्यात आल्याने गावकरी व राजकीय पुढाऱ्यांच्या भुवया उंचाविल्या आहेत. यात पैसा बोलता है. असे सूत्र अवलंबिण्यात आल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.मोबाईल टॉवरला उपलब्ध करण्यात आलेल्या सिंगल फेज दुरुस्ती ट्रान्सफार्मर मधून काही गावकऱ्यांना वीज पुरवठा करणारा कनेक्शन जोडण्यात आल्याने तर्क वितर्क लावले आहेत. हा विद्युत ट्रान्सफार्मर गावकऱ्यांचे हक्काचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे गावात विजेची समस्या निकाली काढताना अडचण निर्माण झाली आहे. वीज वितरण कंपनीला कायमस्वरुपी विजेची समस्या निकाली काढताना अपयश आले आहे. (वार्ताहर)
रोहित्रातील वीज पुरवठा मनोऱ्याला
By admin | Updated: August 17, 2015 00:31 IST