लाखनी : येथील नगरपंचायतमध्ये मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. तीन महिन्यांपासून नवीन मुख्याधिकारी रुजू झालेले नसल्याने तुमसर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लाखनीचा अतिरिक्त कारभार सोपविला आहे.
लाखनी नगरपंचायतची स्थापना १२ फेब्रुवारी २०१५ रोजी करण्यात आली. १६ ऑगस्ट २०१६ पासून २४ जुलै २०१९ पर्यंत कांचन गायकवाड यांनी मुख्य अधिकाऱ्यांचे पद सांभाळले. १ ऑगस्ट २०१९पासून राजेंद्र चिखलखुंदे यांनी मुख्याधिकार्याचे पद सांभाळले. त्यांची नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी येथे २२ डिसेंबर २०२०ला स्थानांतरण झाले. स्थानांतरणानंतर लाखनी नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांचा अतिरिक्त कारभार मोहाडीचे मुख्याधिकारी रामेश्वर पांडागडे यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानंतर सध्या तुमसरचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्याकडे लाखनीचे अतिरिक्त कामकाज देण्यात आले.
लाखनी नगरपंचायतच्या प्रशासकीय कामकाजासाठी पूर्णवेळ मुख्याधिकार्याची गरज आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजाकडे दुर्लक्ष होत आहे. आर्थिक व्यवहारात अडचणी येत आहेत. नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कालावधी संपल्याने नगरपंचायतमध्ये प्रशासक लावण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे प्रशासक म्हणून प्रभार दिला आहे.
पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहत नाही. वर्ग ३ ते ४च्या कर्मचाऱ्यावर नियंत्रण नाही. मुख्याधिकार्याचे विकासकामावर नियंत्रण असते. नगर विकास विभागाने पूर्णवेळ मुख्याधिकारी पाठवावे, अशी जनतेची मागणी आहे.
बॉक्स
लाखनी नगरपंचायतमध्ये स्वच्छता निरीक्षकाचे पद रिक्त आहे. येथील बांधकाम अभियंत्याकडे साकोली व लाखांदूर नगरपंचायतचा अतिरिक्त प्रभार दिला आहे. स्थानिक नगरपंचायतच्या लेखापाल यांच्याकडे लाखांदूरचा प्रभार दिला आहे.