इंद्रपाल कटकवार ल्ल भंडाराश्रमाला कर्तव्याची उपमा देण्यात आली आहे. मानवी जीवनात प्रपंच चालविताना सर्वांनाच श्रम करावे लागते. श्रीमंत असो की गरिब आपआपल्या परिने सर्वंच श्रम करतात. मात्र आजघडीला ‘गरिबांच्या श्रमाला कवडीचा मोल’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाहीे. जिल्ह्यात दहा हजारांच्या घरात कामगारांची संख्या असून अद्यापही हजारो कामगारांची नोंद शासनदफ्तरी नाहीे. परिणामी केंद्र तथा राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा फायदा खऱ्या कामगारांना मिळतो काय? हाच खरा सवाल आहे.भंडारा जिल्ह्यातील उद्योगधंदे रसातळाला गेले आहेत. बोटांवर मोज्याइतकेच उद्योग जिल्ह्यात तग धरून आहेत. राजकिय वशिलेबाजी व शासनाची प्रचंड उदासिनतेमुळे जिल्ह्याचा विकास अंधातरी आहे. नावारूपास असलेले लोकप्रतिनिधी कामगारांच्या प्रश्नांबाबत तितकेच उदासीन आहेत. जिल्ह्यात अनेक संस्था, दुकाने, हॉटेल-उपहारगृहे, घरेलु कामगार, इतर संस्था व उद्योगधंद्यामधील कामगारांचा समावेश होतो. जवळपास १० हजारांच्या आसपास कामगारांची नोंदणी सहायक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात आहे. यात जिल्ह्यात नोंदणीकृत दुकानांची संख्या ६५६ असून कामगारांचीसंख्या १५९० आहे. व्यापारी संस्था १३९१ असून त्या अंतर्गत ४ हजार ९०६ कामगार आहेत. हॉटेल-उपहारगृहांची संख्या २७२ असून ५८१ कामगार कार्यरत आहेत. जिल्ह्यात इतर संस्था अंतर्गत १०१ कामगार कार्यरत आहे. या एकूण कामगारांची संख्या ७२२३ असून उद्योगात असलेल्या कामगारांची संख्या वेगळी आहे. जिल्ह्यात मोठे उद्योग बोटांवर मोजण्या इतपत आहे. यात अशोक लेलँड, सनफ्लॅग, हिंदुस्थान कंपोझिट, महाराष्ट्र मेटल पावडर कंपनी, एलोरा पेपर मिल, चिखला माईन्स यासह अन्य उद्योग आहेत. या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची संख्याही मोठी आहे. याशिवाय लघु उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कारागिरांची संख्या हजारोंच्या घरात आहे. परंतु बहुतांश कामगारांची नोंदणी शासन दप्तरी नाही. याशिवाय संघटनांच्या माध्यमातून नोंदणी करणाऱ्या हजारो कामगार आजही योजनांपासून वंचित आहेत. घरेलु कामगारसह खाजगी व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कामगारांना नेहमी मुलभूत सोयी सवलतीपासून वंचित ठेवले जाते. कामगारांना त्यांचा श्रमाचा मोबदला दिला पाहिजे. कंपनी असो की कुठलीही आस्थापना कामगारांवर अन्याय न करता त्यांचा हक्काचा मोबदला दिला गेला पाहिजे. - श्रीकांत पंचबुद्धे,अध्यक्ष, जिल्हा (इंजि.) कामगार संघ,भंडारा
गरिबांच्या श्रमाला कवडीचा मोल
By admin | Updated: September 22, 2015 00:45 IST