निवडणूक यंत्रणा सज्ज : मतदान प्रक्रीयेवर पोलिसांची करडी नजरंभंडारा : जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या तिन्ही विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उद्या, बुधवारला (दि.१५) मतदान होत आहे. यासाठी निवडणूक विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. मंगळवारला दुपारच्या सुमारास सर्व पोलिंग पार्ट्या पोलीस मुख्यालयातून रवाना करण्यात आले आहेत.बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहील. मतदान प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी आवश्यक ती तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून सर्वच मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तिन्ही मतदारसंघात एकूण ५३ उमेदवार रिंगणात आहेत. तुमसर क्षेत्रात ३५१, भंडारा क्षेत्रात ४४८ तर साकोली क्षेत्रात ३७१ मतदान केंद्र असे एकूण १,१७० मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी ५,६४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात १७ मतदान केंद्र नक्षलप्रभावित क्षेत्रात तर ९ केंद्र संवेदनशील आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलिसांनी पॅरामिल्ट्री फोर्स व राज्य राखीव दलाच्या ४ कंपन्यांसह ४ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. (प्रतिनिधी)
पोलिंगपार्ट्या रवाना; आज मतदान
By admin | Updated: October 14, 2014 23:13 IST