कारवाईची मागणी : तुमसर येथील घटना
तुमसर :
येथील कुंभार वॉर्डात पान व्यावसायिकाला त्याच्या दुकानासमोर सहायक पोलीस निरीक्षकाने मारहाण केली. रक्तबंबाळ स्थितीत सहायक पोलीस निरीक्षक व अन्य पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले. यामुळे शहरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. ही घटना बुधवारला दुपारी २ च्या सुमारास घडली. विक्रांत देवदास बन्सोड (२६) रा.आंबेडकर वॉर्ड असे जखमी दुकानदाराचे नाव आहे. विक्रांत स्वत:चे पान दुकान बंद करून घराकडे जाण्यासाठी निघाला. तितक्यात पोलिसांचे वाहन आले.
त्या वाहनात सहायक पोलीस निरीक्षक ए.एम. जाधव, पोलीस शिपाई मेश्राम व इतर पोलीस होते. जाधव यांनी विक्रांतला तु दादागीरी करतोस असे म्हणून मारहाणीला सुरुवात केली. यात विक्रांतच्या डोक्याला जबर जखम झाली. रक्तबंबाळ अवस्थेत जाधव यांनी खाजगी रुग्णालयात गेले, असे बयान विक्रांत बंसोड यांनी दिले. नगरसेवक प्रशांत उके व त्याच्या मित्रांनी खाजगी रुग्णालयातून उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मारहाण प्रकरणी नगरसेवक प्रशांत उके यांनी सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक किशोर गवई यांना केली.
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन भोईटे यांनी दिले. (तालुका प्रतिनिधी) दोन गटात भांडण होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन कुंभारे वार्डात विक्रांत बंसोड याच्या पान दुकानात चार ते पाच युवकांची टोळी दिसली. त्यांना तेथून जाण्यास सांगितले. विक्रांत याच्याशी शाब्दीक बाचाबाची झाली. अंगावर येत असल्यामुळे त्यांना दूर ढकलले त्यात तो वाहनावर पडला. त्याला मारहाण केली नाही. मारहाण केल्याचे आरोप निराधार आहेत. - ए.एम. जाधव, सहायक पोलीस निरीक्षक,भंडारा