अड्याळ : औरंगाबादेतील मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात आंबेडकरी प्रेरणेची बासमती मिसळली असून तेथील प्रबोधनकारी वातावरण वाड:मयीन सांस्कृतिक उर्जा देणारे आहे. मिलिंद हे केवळ एक महाविद्यालय नसून पुरोगामी महाराष्ट्र घडविणारे एक विद्यापीठच आहे, असे प्रतिपादन प्राचार्य भगवान सुखदेवे यांनी केले.ते युगसंवाद वाड:मयीन आणि सांस्कृतिक संस्था भंडारा आणि विदर्भ साहित्य संघ भंडारा शाखेच्या वतीने आयोजित कवी आणि कविता या उपक्रमाच्या चौथ्या भागात भगवान सुखदेवे बोलत होते. काव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. धनंजय भिमटे होते. अतिथी म्हणून प्रल्हाद सोनेवाने, डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे, डॉ. अनिल नितनवरे उपस्थित होते. युगसंवादच्या वतीने कवी भगवान सुखदेवे यांचा शाल व सन्मानचिन्ह देवून डॉ. धनंजय भिमटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर कवी सुखदेवे यांची मुलाखत डॉ. उमेश बन्सोड यांनी घेतली. यावेळी भगवान सुखदेवे यांनी साहित्य साधलेचे मर्म सांगताना म्हणाले. महाविद्यालयीन शिक्षण काळात मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. म. ना. वानखेडे, प्रा. पिंगे आणि त्यावेळचे विद्यार्थी कवी वामन निंबाळकर यांच्या प्रभावातून आपले वैचारिक व वाड:मय व्यक्तिमत्व घडले. सध्या सर्वच पुरोगामी आघाड्यांवर अस्वस्थ करणारे वास्तव असले तरी अजून निराश झालो नाही, असा आशावाद त्यांनी बोलून दाखविला. मुलाखतीनंतर भगवान सुखदेवे यांनी आपल्या निवडक कवितांचे अभिवाचन केले. यावेळी हर्षल मेश्राम यांनी प्रा. जगजीवन कोटांगले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. समारंभाध्यक्ष डॉ. धनंजय भिमटे यांनी सुखदेवेंच्या कवितेचे नाते सावित्रीबाई व ज्योतीराव फुले आणि कवी केशवसुत यांच्या कवितेशी जुळत असल्याचे प्रतिपादन केले.समारंभाचे प्रास्ताविक डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी तर संचालन युगसंवादचे सचिव प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले. प्रा. ममता राऊत यांच्या आभार प्रदर्शनाने काव्यसोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यासाठी अड्याळ येथील जि.प. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख, धनंजय मुलकलवार, रोहिदास राठोड, यशवंत कोहकर, संयोजक प्रमोदकुमार अणेराव यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील अनेक काव्यप्रेमी, रसिक मंडळी उपस्थित होते. (वार्ताहर)
अड्याळ येथे कवी आणि कविता उपक्रम
By admin | Updated: July 1, 2016 00:45 IST