संपत खिल्लारी : ‘संवादपर्व’ माहिती जनसंपर्क महासंचालकाचा उपक्रमभंडारा : शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या योजना व उपक्रामची जनजागृती व्हावी, तसेच त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. या योजनेत नागरिकांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा व क्रियाशिलता वाढवावी हाच संवादपर्व कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे प्रतिपादन भंडाराचे उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी यांनी केले.गणेशोत्सवात सामाजिक जाणीव जागृतीची, प्रबोधनाची श्रेष्ठ परंपरा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने पुढे नेण्यासाठी ठरविले आहे. गणेशोत्सवादरम्यान संवादपर्व जनप्रबोधनात्मक उपक्रम राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने गणशेपूर येथील सन्मित्र गणेशोत्सव मंडळात आयोजित संवादपर्व कार्यक्रमात ते बोलत होते.संवादपर्व कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवी धकाते, अग्रणी बँकेचे विजय बागडे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, आरोग्य माहिती व विस्तार अधिकारी भगवान मस्के, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, सन्मित्र गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विनोद भुरे, सचिव संजय भांडारकर उपस्थित होते.यावेळी डॉ.खिलारी म्हणाले, आपण स्वत:चा व कुटुंबाचा विचार करतो. परंतु त्याबरोबर सर्व समाजाचा विचार करणे आवश्यक असून आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून समाजाची उन्नती कशी होईल यावर भर दिला पाहिजे. शासनासोबत राहून त्यांच्या योजना समाजासमोर पोहचवून समाजाचा उत्थान व हातभार लावू शकतो. असे आवाहन केले. आपले सरकार या वेब पोर्टलवर आपण सर्व योजनांची माहिती करून घेऊ शकतो. माहिती विभागाच्या होर्डिंगवर शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेवू शकतो.गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक सोहळा आहे. या सांस्कृतिक सोहळ्यास लोकमान्य टिळक यांच्यामुळे सामाजिक महत्वही प्राप्त झाले आहे. जनतेला आनंद, उत्साह आणि उर्जा देणाऱ्या या उत्सवाचा उपयोग सामाजिक जाणीव जागृतीसाठी प्रभावीरित्या करता येईल. बेटी बचाव बेटी पढावो, अवयवदान शासनाच्या या सर्व योजनांमध्ये सर्व नागरिकांनी सक्रीय सहभागी व्हावे असेही ते म्हणाले. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, राष्ट्रीय अपंगत्व योजना, राष्ट्रीय अर्थसहाय्य योजना, शिधापत्रिका वाटप, महाराजस्व अभियान, महासमाधान योजनांचा लाभ घ्यावा.शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत १८ विभागाच्या १७६ योजनांची माहिती व लाभ एकाच ठिकाणी नागरिकांना मिळतो. म्हणून या शिबिरात सहभागी होवून आपले जीवन समृद्ध करावे असेही त्यांनी सांगितले.यावेळी डॉ.धकाते म्हणाले, संवादपर्व हा जनजागृतीपर कार्यक्रम प्रशंसनीय आहे. गेल्या ३० तारखेस भव्य रॅली काढून अवयवदान मोहिमेला जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली. या मोहिमेस फार मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अवयवदान ही सामाजिक चळवळ व्हावी, असे ते म्हणाले. अवयवदान हे मरणोपरांत आहे. नरेंद्रनाथाच्या प्रोत्साहनामुळे ५० हजार लोक या चळवळी सहभागी झाले आहेत. तसेच ६५ हजार लोकांना देहदानासाठी प्रोत्साहीत केले. अवयवदान योजनेचे ब्रॅण्ड अॅब्मेसिडर रवी वानखेडे या स्वत:पासून अवयवदानाची सुरुवात करून संपूर्ण देहदान केले. या अवयवदान मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे. सर्व गणेशमंडळांना देहदानाविषयी टारगेट ठरवून देण्यात येणार आहे. या गणेश मंडळांनी सुद्धा सहकार्य करावे असेही ते म्हणाले.यावेळी विजय बागडे यांनी अग्रणी बँकेच्या वतीने प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजनेबाबत माहिती दिली. या योजनेसाठी लाभार्थ्यांकडे मुद्रा कार्ड व डेबीड कार्ड असणे आवश्यक आहे. ही योजना शिशू, किशोर व तरुण अशा तीन टप्प्यात आहे. भगवान मस्के यांनी आरोग्य विभागाच्या जननी शिशु योजना, पीसीपीएनडीटी द्वारे गर्भलिंग तपासणीवर बंदी, तसेच महिलांना प्रसुती काळात व नवजात बालकांना ने आण करण्याकरिता २४ तास मोफत सेवा देण्यात येते. असे सांगितले. राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे गावपातळीवर तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा शिबिरात देण्यात येते. सिकलसेल, लसीकरण, तपासणी करण्यात येते. संचालन रवी गीते यांनी तर आभार मंडळाचे अध्यक्ष विनोद भुरे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
योजनांच्या कार्यान्वयासाठी लोकसहभाग महत्त्वाचा
By admin | Updated: September 14, 2016 00:33 IST