५५ हजारांचा दंड वसूल : अन्न व औषध प्रशासनाची कारवाईभंडारा : कमी दर्जा व मिथ्याछाप अन्नपदार्थ विक्रीप्रकरणी चार प्रकरणांतील अन्न व्यवसायिकांवर एकूण ५५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. भंडारा येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात विशेष शिबिर बुधवारी घेण्यात आला. त्यावेळी न्याय निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी न्याय निवाडा केला. अन्न सुरक्षा अधिकारी व्ही.पी. धवड यांनी वल्लभाश्रय ट्रेडिंग कंपनी स्टेशन रोड भंडारा येथून तपासणी केलेला रिफार्इंड सोयाबिन तेल (मदन चाईस ब्रॉन्ड) कमी दर्जाचा आढळून आला. त्यामुळे प्रकरण नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी उत्पादक सुंदरमल बानोमल झांबानी रा. दाभा जि. अमरावती यांच्या विरूद्ध २० हजाराचा दंड ठोठावला आहे. दुसऱ्या प्रकरणात राजेश एजन्सीस स्टेशन रोड भंडारा येथून तपासण्यात आलेला रिफाईन्ड सोयाबीन तेल (सारथी ब्राण्ड) कमी दर्जाचा आढळून आला. याप्रकरणी सुंदरमल बानोमल झांबानी रा. दाभा जि. अमरावती यांच्या विरूद्ध १५ हजार रूपये दंड ठोठावला. अन्न सुरक्षा अधिकारी यांनी मनिष फ्रुट इंडस्ट्रीज मुंडीपार जि. गोंदिया येथील तपासणी केली असता पणीर, अन्न पदार्थ कमी दर्जाचा आढळून आला. याप्रकरणी विलास अडकीने व इंडस्ट्रीज विरूद्ध प्रत्येकी पाच हजार रूपये असा एकूण १० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. सत्यम ट्रेडिंग कंपनी गोंदिया येथील तुळ दाळची तपासणी केली असता कमी दर्जा असल्याचे आढळून आले. याप्रकरणी श्रीचंद रेलुमल दुसेजा यांच्या विरूद्ध १० हजार रूपये दंड ठोठावला आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कमी दर्जा असलेल्या अन्न पदार्थ प्रकरणी व्यवसायीकांवर कारवाई करण्यात येत असल्यामुळे चांगल्या प्रतीच्या अन्न पदार्थांची विक्री करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)
‘त्या’ व्यावसायिकांना दंड
By admin | Updated: June 19, 2015 00:57 IST