पवनी : राज्यात प्रथमच नागरी भागासाठी राबविण्यात आलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पवनी शहराला हागणदारीमुक्त करण्यात यशस्वी झाल्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे पवनीच्या नगराध्यक्षा रजनी मोटघरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मुंबई येथील टाटा सभागृह नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्टस् येथे सत्कार समारंभात नगराध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागात यापूर्वी ग्राम स्वच्छता अभियान प्रभाविपणे राबवून गाव खेडे हागणदारीमुक्त करण्यात आले. युती शासनाने स्वच्छ भारत अंतर्गत राज्यातील नागरी भागासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविला. त्याअंतर्गत शहरातील प्रत्येक कुटुंबासाठी शौचालय निर्माण करून संपूर्ण राज्य स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प शासनाने आखलेला आहे. पवनी नगरपालिकेने सहभाग नोंदवून पवनी शहर हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केला. शौचालय नसलेले कुटुंब शोधून त्यांना बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला. सार्वजनिक शौचालयाची रंगरंगोटी करून पाण्याची उपलब्धता करून दिली. गावातील घाणीचे ठिकाण शोधून गुड मॉर्निंग पथकाद्वारे उघड्यावर शौच्छास बसणाऱ्या नागरिकांवर प्रतिबंध घातला. जनजागृतीच्या माध्यमातून लोकांमध्ये स्वच्छतेचा संदेश दिला. पालिकेचे कर्मचारी, शिक्षकवृंद यांनी गुड मॉर्निंग पथकात सक्रीय सहभाग घेतला. लोकांनी सहकार्य केल्यामुळे राज्यपातळीवर सन्मान मिळविण्याचा मान पालिकेला मिळालेला आहे. पवनी शहर सदैव स्वच्छ व सुंदर राहावे अशी नगरवासीयांची भावना आहे. पहिला वहिला पुरस्कार मिळाल्याने नागरिकांत आनंदमय वातावरण आहे. (तालुका प्रतिनिधी)
पवनी पालिकेला मिळाला हागणदारीमुक्त गावाचा पुरस्कार
By admin | Updated: October 16, 2016 00:27 IST