तुमसर : समाजातील उपेक्षित घटकांवर अन्याय, अत्याचार रोखण्यास शासन अपयशी ठरली आहे. अन्याय, अत्याचार रोखण्याकरिता गावागावात पथक निर्माण करणे गरजेचे आहे. इतरांच्या वेदना आपल्या संवेदना झाल्या पाहिजे, असे परखड विचार ज्येष्ठ कवी व साहित्यीक यशवंत मनोहर यांनी केले. तुमसर - खैरलांजी - खर्डा - मुंबई बाईकर्स रॅलीचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी यशवंत मनोहर तथा इतरांनी रॅलीला निळी झेंडी दाखविली. यशवंत मनोहर म्हणाले, हल्ली आंदोलन, चळवळी थंडावत चालल्या आहेत. समाजात जनजागरण करण्याची गरज असून मनोधैर्य वाढविण्याची खरी गरज आहे. उपेक्षित, बहिष्कृत घटकांना आज उलट संघटनेची गरज आहे. रॅली संपली तरी ही उपेक्षितांची चळवळ संपणार नाही. खैरलांजी, खर्डा येथे अशा अमानवी घटना पुरोगामी महाराष्ट्रात सातत्याने घडत आहेत. हे रोखण्याकरिता तरुण पथक तात्काळ धावून जाण्याकरिताच ही जागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीचा प्रवास १८ ते २६ जून असून मुंबईतील आझाद मैदानात तिचा समारोप होणार आहे. याप्रसंगी मंचावर प्रसिद्ध साहित्यीक नजूबाई गावीत, रमेश बिजेकर, संयोजक किशोर जाधव, कवी भाऊ पंचभाई, डॉ.राहुल भगत, प्रा.उबाळे, प्रा.सुनिल चवळे, हिमाचल खोब्रागडे उपस्थित होते. यावेळी रॅलीचे संयोजक किशोर जाधव यांनी ही रॅली झाल्यानंतर वर्षभराचा कार्यक्रम राबविला जाईल. शिबिर आयोजित करणे, प्रबोधनाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. रॅली समारोपाप्रसंगी शासनाला निवेदन देण्यात येणार नाही. रॅलीस्थळी गावागावात खर्डा संसद, श्वेतपत्रिका, दलितांवर अत्याचार कमी व्हावे, कृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तुमसर - खैरलांजी - खर्डा - मुंबई बाईकर्स रॅलीकरिता कुणाकडूनही आर्थिक मदत घेतली गेली नाही, असे आवर्जून सांगितले. याप्रसंगी सुमारे २०० बाईकर्स सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
इतरांच्या वेदना आपल्या संवेदना ठराव्यात
By admin | Updated: June 19, 2014 23:41 IST