कोंढा (कोसरा) : पवनी तालुक्यातील कोंढा चौरास भागात पाऊस अत्यल्प पडत असल्याने धान पिकांची स्थिती चिंताजनक झाली आहे. पाऊस पुरेसा प्रमाणात न पडल्याने अनेकांचे रोवणी झाली नाही अशा या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.जुलै, महिन्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला पण पावसाचे प्रमाण नंतर कमी झाल्याने शेतातील पाणी पूर्णता आटले जमिनीला भेगा पडल्या. मागील आठवड्यात तुरळक पाऊस पडले त्यामुळे धानपिक उभे आहे. पण निंदन शेतात कमी पावसामुळे जोर धरत आहे. अशावेळी निंदन खर्च वाढणार आहे.पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने नदी, नाले, यांना पूर आले नाही. तलाव पूर्णत: कोरडे आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर पाऊस न पडल्याने रोवणी केली नाही. कोंढा, कोसरा, चुऱ्हाड, विरली (खंदार) पिंपळगाव (निपानी), नवेगाव, आकोट या गावच्या अनेक शेतकऱ्यांनी रोवणी केली नाही. दुष्काळ सदृश्य परिस्थिती कोंढा परिसरात सध्या दिसत आहे. पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात ३० ते ४० टक्के रोवणी झाली असून रोपे वाळू वाढली आहेत. हलक्याप्रतीचे धानाची यापुढे रोवणी करून काहीही उपयोग नाही, असे शेतकरी म्हणत आहे. पावसाचे प्रमाण एकंदरीत कमीच आहे. या महिन्यात दमदार पाऊस न पडल्यास पवनी तालुक्यातील कोंढा परिसर दुष्काळाच्या छायेत येऊ शकते. (वार्ताहर)
कोंढा परिसरातील धानपीक संकटात
By admin | Updated: August 13, 2015 01:30 IST