लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात १,९५,००० हेक्टरवर विविध पिकांची लागवड अपेक्षित आहे. त्यात १,८५,५०० हेक्टरवर धानाची लागवड होणार आहे. मात्र, १९ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ १७.२ मिमी पाऊस पडला असून, अपेक्षित १८९ मिमीच्या तुलनेत ही केवळ ९.१ टक्के इतकी आहे. तालुकानिहाय पर्जन्यमान पाहता पवनी (३२.८ मिमी) आणि लाखांदूर (२८.९ मिमी) वगळता बहुतांश तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. केवळ बोरवेल्सची साधने असलेल्यांची २ टक्के धान पेरणी आटोपली आहे.
भंडारा जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील कमी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास कृषी क्षेत्रावर अनिष्ट परिणामाची शक्यता आहे.
तलाव, बोड्यांत पाण्याचा ठणठणाट कायमभंडारा विदर्भातील एक महत्त्वाचा धान उत्पादक जिल्हा असून, तो तळ्यांसाठी आणि सुगंधी तांदळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. खरिपात, मका, सोयाबीन, कापूस ही प्रमुख पिके घेतली जातात. परंतु, पाऊस लांबल्याने तलाव, बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे.
रिमझिम पावसाने किंचित दिलासाजिल्ह्यात गुरुवारला काही ठिकाणी रात्रीच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांना किंचित दिलासा मिळाला आहे. भरपूर पाऊस पडण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पेरणीसाठी अद्यापही वातावरण निर्मिती नाही.
पावसाअभावी नुकसानपाऊस लांबल्याने पेरणीस विलंब होऊ शकतो. विशेषतः धान पिकासाठी वेळेवर पाऊस आवश्यक असतो; उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात घट येऊ शकते. पेरणीसाठी आवश्यक असणारा ओलावा जमिनीत नसल्याने बियाण्यांची उगवण कमी होण्याची शक्यता असते. काही भागात (पवनी, लाखांदूर) तुलनेने जास्त पाऊस झाला असला तरी बहुतेक तालुक्यांत प्रमाण अत्यल्प आहे.
पीक पद्धतीत बदलाची आवश्यकता
- हवामान-प्रतिरोधक शेती पद्धती अवलंबणे उपयुक्त ठरेल.
- धानाऐवजी कमी पाण्यावर 3 येणाऱ्या ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद यांसारख्या पिकांचा पर्याय विचारात घ्यावा.
- उशिरा येणाऱ्या पावसाचा अंदाज 3 घेत पीक निवड बदलावी, तसेच लवकर वाढणाऱ्या आणि कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड करावी. पेरणीस विलंब झाल्यास खत व्यवस्थापन, पाणी साठवण आणि आंतरमशागत याकडे विशेष लक्ष द्यावे.
"जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, पाऊस पडून जमिनीत योग्य प्रमाणात ओलावा तयार झाल्यानंतरच पेरणी करावी."- पद्माकर गिदमारे, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.