लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हा त्यावरील प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे लसीकरणावर भर दिला जात आहे. याच आनुषंगाने येथील पंचायत समिती सभागृहात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात एक हजार कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला. गोरेगाव तालुक्यात अपेक्षित १४० पैकी १४० डोस उपयोगात आणण्यात आल्या. शिबिरात जि. प. व खासगी अनुदानित शाळेतील एकूण ८१६ कर्मचाऱ्यांपैकी पहिला डोस घेतलेले ७३३ कर्मचारी, दुसरा डोस ५४५ कर्मचारी असून, दुसरा डोस बाकी असलेले २७१ व एकही डोस न घेतलेले ८३ कर्मचारी असल्याची माहिती आहे. प्रामुख्याने लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये, कोविड प्रादुर्भाव असलेले, आजारी व इतर कारणांमुळे लस घेता न येणारे कर्मचारी असल्याची माहिती आहे. लसीकरण कार्यात आरोग्य विभाग तसेच शिक्षण विभागाचे कर्मचारी सहकार्य करीत असून, तहसीलदार सचिन गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली गट विकास अधिकारी झामसिंग टेंभरे,आरोग्य अधिकारी अनंत चांदेकर व त्यांचे कर्मचारी, गटशिक्षणाधिकारी नीलकंठ शिरसाटे व गट साधन केंद्र गोरेगावचे साधन व्यक्ती सुनील ठाकूर, सतीश बावनकर, नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, वैद्यकीय चमू, सर्व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. दोन दिवसीय कोविड लसीकरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.