लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाची प्रत्येकानेच धास्ती घेतली असून, काही लक्षणे आढळली की, थेट कोरोना चाचणीसाठी धाव घेतली जात आहे. त्यामुळेच अवघ्या पंधरा दिवसांत एक लाखावर नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. एप्रिल महिन्याच्या दोन आठवड्यांत तब्बल १७ हजार ४७० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत असून, प्रत्येक जण आता कोरोना चाचणीसाठी धडपड करताना दिसत आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होत आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोना चाचणीसाठी मागे-पुढे पाहणारे आता कोरोनाचे तांडव पाहून स्वत:हून चाचणीसाठी पुढे येत आहेत. जिल्ह्यात १ ते १५ एप्रिलपर्यंत एक लाख २८ हजार ४१४ व्यक्तींनी कोरोना चाचणी केली होती. त्यात अँटिजन चाचणी ९३ हजार ६२ आणि आरटीपीसीआर चाचणी केलेल्यांमध्ये नऊ हजार ७५२ व्यक्तींचा समावेश आहे. गत आठवड्यात प्रशासनाने कोरोना चाचणी वाढवून ठिकठिकाणी चाचणीसाठी सुविधा उपलब्ध करून दिली होती. परिणामी, कोरोना चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढली. मात्र, प्रशासनापेक्षाही कोरोनाच्या भीतीने प्रत्येक जण आता आपली कोरोना चाचणी करून घेण्यासाठी धडपडताना दिसत आहे. अँटिजन चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर अनेक जण आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी उत्सुक असतात. जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर चाचणी कमी प्रमाणात होत असल्याची माहिती आहे. त्यामुळेच आरटीपीसीआर चाचणीसाठी अनेक जण चौकशी करताना दिसून येतात.
१६ मृत्यू, १,३९३ पॉझिटिव्ह
जिल्ह्यात शुक्रवारी १६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, तर १,३९३ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आठ हजार ५४२ व्यक्तींची चाचणी केल्यानंतर त्यात भंडारा तालुक्यात ५९३, मोहाडी ९१, तुमसर १८८, पवनी १६४, लाखनी १४६, साकोली १६२ आणि लाखांदूर तालुक्यात ८९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात १६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात भंडारा तालुक्यात आठ, पवनी तीन, मोहाडी दोन, तर तुमसर, लाखनी आणि साकोली तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
१२ हजार ६१२ ॲक्टिव्ह जिल्ह्यात आतापर्यंत ३५ हजार ११५ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाला असून, त्यापैकी २१ हजार ९९३ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर ५१० जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १२ हजार ६१२ व्यक्ती ॲक्टिव्ह आहेत. त्यात भंडारा तालुका पाच हजार एक, मोहाडी १,०९१, तुमसर १,५२५, पवनी १,६९१, लाखनी १,३२६, साकोली १,१३८ आणि लाखांदूर तालुक्यात ८४० रुग्ण आहेत. जिल्ह्याचा मृत्यू दर १.४५ टक्का आहे.