तुमसर : तुमसर येथून २0 कि.मी. अंतरावरील चिखला येथे काही अज्ञातांनी दबंगगिरी करुन एका दलित वृद्ध महिलेचे घर भूईसपाट केले. गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलीस येथे बघ्याच्या भूमिकेत दिसत आहे. तक्रारकर्ता वृद्ध महिलेने गृहमंत्री, पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालकाकडे लेखी तक्रार केली आहे.चिखला येथील वृद्ध दलित महिलेचे नाव पारबता बालकदास गजभिये (७0) असून पतीच्या नावाने शासकीय जागेवर घर होता. शासकीय नजूल आखीव पत्रिका क्रमांक १५५ अनुक्रमांक १५५ चौ.मी. १७0 वर अतिक्रमण बालकदास श्रावण गजभिये याच्या नावाने दाखल आहे. घर जीर्ण झाल्याने काही वर्षापासून हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. पारबताच्या पतीने दुसरे लग्न केले असून ते सध्या वेगळे राहतात. मुलगा व सून वेगळे राहत असल्याची माहिती आहे.पारबता मोलमजूरी करुन आपले उदरनिर्वाह चालवित आहे. भाड्याच्या घरात ती राहू शकत नाही म्हणून पारबताने आपल्या हक्काच्या (पट्टेप्राप्त) जागेवर गवताची झोपडी तयार केली होती व ती तिथेच एकटी राहत होती.दि. १८ मे ला पारबता मोलमजुरी करीता बाहेर गेली तेव्हा गवताची झोपडी पाडलेली दिसली. घरातील जीवनोपयोगी सामान फेकलेले होते. याबाबत पारबताने घराजवळील नागरिकांना विचारणा केल्यावर गावातील एका इसमाने चार ते पाच जण आणून झोपडी भूईसपाट केल्याची माहिती दिली.पारबता गजभिये हिने दि. १९ मे रोजी गोबरवाही पोलीस ठाण्यात त्या इसमाविरोधात तक्रार नोंदविली. परंतु १२ दिवसांपासून पोलीस साधी विचारपूस करायलाही आले नाहीत. मी दलित व असहाय्य एकटी असल्याने माझ्यावर अन्याय झाला आहे.दोषींवर कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा पारबता गजभिये यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
वृद्धेचे घर केले भूईसपाट
By admin | Updated: June 5, 2014 23:50 IST