अल्टीमेटम : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदनभंडारा : पवनी तालुक्यात २४ आॅगस्ट रोजी घडलेल्या घटनेचा व पोलिस अधीक्षकांचा निषेध करित पवनीतील आरोपींना अटक करण्याकरीता जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले होते. दरम्यान नागरिकांना होणारा त्रास व आरोपींना अटक केल्यामुळे सदर आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे २७ आॅगस्टपासून सुरु असलेल्या लेखणी बंद आंदोलनाचा नियोजित कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. सर्व कर्मचारी सोमवार ३१ ला पूर्ववत कामावर उपस्थित राहणार आहेत. पंरतु सदर प्रकरणात ७ सप्टेंबर पर्यंत तोडगा न निघाल्यास नियोजित कार्यक्रमानुसार बेमुदत संप करण्यात येईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे. आरोपींवर कारवाई पोलीस विभागाने न केल्यामुळे तहसीलदार नायब तहसीलदार संघटना, जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, मंडळ अधिकारी संघटना, वाहन चालक संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना व कोटवार संघटना यांनी घेतलेल्या निर्णयानुसार २७ आॅगस्ट पासून जिल्हयातील संपूर्ण कर्मचारी लेखणी बंद आंदोलनात सहभागी झाले होते.जिल्हयातील सातही तालुक्यात लेखणी बंद कार्यक्रमामुळे जनतेची कामे तसेच अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्यामुळे सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी २९ आॅगस्ट ला एकत्रित चर्चा करुन सुरु असलेले लेखणी बंद आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचे ठरविले. (प्रतिनिधी)
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन मागे
By admin | Updated: August 31, 2015 00:29 IST