ओबीसी संघटनांची सभा : खुशाल बोपचे यांचे प्रतिपादनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने देशातील ओबीसींना संघटित करुन घटनात्मक अधिकारासाठी काम करीत असलेल्या विविध ओबीसी संघटनांना एकसूत्रात बांधून राज्यघटनेतील ३४० व्या कलमांनुसार हक्क अधिकार मिळावा, यासाठी हा लढा सुरु करण्यात आला आहे. या ओबीसींच्या लढ्यात सहभागी होऊन सत्ताधारी सरकारवर ओबीसींनी शक्तीचा परिचय देत दबावतंत्राच्या माध्यमातून ओबीसींच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वय माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांनी केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ, ओबीसी विद्यार्थी संघटना व तसेच ओबीसी अंतर्गत येणाऱ्या सर्व संघटनांच्या वतीने विश्रामगृह येथे आयोजित जिल्हास्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकिला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ संघटक खेमेंद्र कटरे, गुणेश्वर आरीकर, भंडारा जिल्हा संघटक डॉ.अजय तुमसरे, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबार्ते, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर, भैय्याजी लांबट, भैय्याजी रडके आदी प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते. डॉ.बोपचे म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग हा सर्वाधिक ओबीसी समाजात मोडणारा आहे. शेतकरी समृध्द व्हावा, यासाठी ओबीसी महासंघाने आधीपासूनच शेतकरी कर्जमुक्तीसोबतच स्वामीनाथन आयोगाची शिफारसी लागू करुन वयाच्या ६० वर्षांनंतर पेंशन लागू करण्याची मागणी रेटून धरली आहे. ओबीसी समाज हा विविध जातीमध्ये विखुरला असल्याने संघटित होण्यासाठी वेळ लागत आहे, या संधीचा लाभ घेत काही उच्चवर्णीय ओबीसीमधील जातीजातीमध्ये मतभेद निर्माण करुन आपली पोळी शेकण्याचे काम करीत आहेत, त्यासाठी आपण सर्वांनी सजग व्हावे, असे आवाहन केले. प्रास्तविक खेमेंद्र कटरे यांनी केले. संचालन भंडारा जिल्हा संघटक डॉ.अजय तुमसरे यांनी तर, आभार जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबार्ते यांनी मानले. बैठकिला राजकुमार माटे, शब्बीरभाई पठाण, उमेश मोहतुरे, मनोज बोरकर, सदानंद इलमे, नीलकंठ कायते, तुळशीराम बोन्द्रे, डॉ महादेव महाजन, भूमिपाल टांगले, यादोराव मानापुरे, ईश्वर निकुडे, संजय आजबले, प्रभाकर कळंबे, अशोक गायधनी, माधवराव फसाटे आदी उपस्थित होते.
घटनात्मक अधिकारासाठी ओबीसींचा लढा
By admin | Updated: June 27, 2017 00:37 IST