लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातून गेलेल्या रेल्वे मार्गावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रेल्वेची संख्या वाढविण्यात आली असली तरी भंडारा रोड रेल्वे (वरठी) स्थानकावर हवे तेवढे थांबे देण्यात आलेले नाहीत. मुंबई - हावडा मार्गावर सर्वाधिक गर्दी असतानाही थांब्याबाबत विचार करण्यात येत नाही.भंडारा हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असतानाही याठिकाणी बहुतांश एक्स्प्रेस व सुफरफास्ट गाड्या थांबत नाहीत. या मार्गावर प्रवाशांची मोठी संख्या असतानाही थांब्यासाठी दुजाभाव कायम आहे.
मी परवा रेल्वेतून प्रवास केला. एक्स्प्रेस गाडी असतानाही काही प्रवाशांनी मास्क घातले नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत असले तरी एक नियम पाळायचा आणि दुसरा पायदळी तुडवायचा, असा प्रकार दिसून आला. टीटी आल्यावरही काहींनी मास्क घातले. परंतु टीटी परत गेल्यावर काहींनी पुन्हा मास्क काढून टाकले. आरोग्याची भीती सर्वांनाच असते. कोरोनाने सर्वांना त्रस्त करून सोडल्यानंतर नागरिकांनीही यापासून बोध घ्यायला हवा. -सुलोचना वाढई, प्रवासी
भंडारा रेल्वे येथे सहा एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत. एक लोकल गाडीही धावत आहे. मात्र, डब्यांमध्ये प्रवासी मास्कविना आढळून आले. त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. काही प्रवासी कोविड नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण घटत असले तरी अन्य राज्यात कोरोनाचे रुग्ण आताही सक्रिय आहेत. परिणामी डब्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन अत्यंत आवश्यक झाले आहे. याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज आहे.-अविनाश साखरे, प्रवासी
एकमेकांकडे अंगुलीनिर्देश
- भंडारा हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असताना याठिकाणी बहुतांश एक्स्प्रेस व सुफरफास्ट गाड्या थांबत नाहीत. मुंबई ते हावड़ा या मार्गावर प्रवाशांची मोठी संख्या असते. एकट्या भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करीत आहेत. लोकल मेमो रेल्वे दीड वर्षापासून बंद आहे. गाड्या सुरू करण्यासाठी कुणीही पुढाकार न घेता एकमेकांकडे अंगुली निर्देश केले जात आहेत. ही चिंतनीय बाब आहे.
सुरू असलेल्या रेल्वे गाड्या
- भंडारा रोड रेल्वे (वरठी) स्थानकातून एक लोकल गाडी सुरू आहे. याशिवाय एक्स्प्रेसअंतर्गत विदर्भ, महाराष्ट्र, गितांजली, निजामुद्दीन आणि अहमदाबाद एक्स्प्रेस या रेल्वे गाडीचा प्रवास सुरू आहे.
सर्वाधिक गर्दी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची
- एकट्या भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करीत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख रेल्वेस्थानक असतानाही दुसरीकडे थांबे देण्यात आले आहेत. - नागपूरनंतर सरळ गोंदियाला अनेक गाड्यांचे थांबे आहेत. मात्र, जिल्हा मुख्यालय असतानाही महत्त्वपूर्ण रेल्वे गाड्यांचे थांबे का नाहीत, याचे उत्तर लोकप्रतिनिधीही द्यायला तयार नाहीत. रेल्वेची संख्या वाढली. थांबे मात्र का वाढ नाहीत, हाही एक सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारा प्रश्न आहे. याकडे लोकप्रतिनधींनी लक्ष देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.