नऊ गावांची निवड : वन विभागाची योजनारंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा) जंगलव्याप्त गावात कुऱ्हाड बंदी घोषित करण्यात आल्यानंतर नागरिकांसाठी वन विभागाने अभिनव उपक्रम सुरु केला आहे. गावातील नागरिकांना सौर सुधारित चुली व साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. यात सिहोरा परिसरातील नऊ गावांचा समावेश करण्यात आला आहे.सिहोरा परिसरात राखीव व संरक्षीत वनात सहा हजार हेक्टर आर हून अधिक क्षेत्रात वनाची व्याप्ती आहे. येथे वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे. त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी वन विभागामार्फत अनेक अभिनव योजना सुरु केल्या आहेत. परिसरातील गावात कुऱ्हाड बंदी करण्यात आल्याने इंधनासाठी गॅस सिलेंडर वाटप करण्यात आले आहे. जंगल शेजारी वास्तव्य करणारे गावकरी यांना वनात प्रवेश बंदी करण्यात येत असल्याने त्यांच्या समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न वन विभागामार्फत सुरु आहे. जळावू लाकडांची गरज असल्याने गावकरी जंगलात धाव घेतात. यात अनेकदा मानव-प्राणी संघर्ष झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे गावात वास्तव्य करणाऱ्या संपूर्ण कुटुंबाना सौर साहित्याचे वाटप केले जाणार आहे. या योजनेत मुरली, सोनेगाव, धनेगाव, चुल्हरडोह, दावेझरी, चांदपूर, सोंड्या, टेमनी, सोदेपूर गावाचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रत्येक कुटुंबांना सौर दिवे, सौर कुकर व सौर सुधारित चुलीचे वाटप केले जाणार आहे. या गावातील १० हजारहून अधिक नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार आहे. वन विभागाचे सहाय्यक कार्यालय अंतर्गत अशा आशयाचे प्रस्ताव वरिष्ठ विभागांना सादर करण्यात आले आहे. वन विभागाने वनग्राम योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत गावकऱ्यांना साहित्य विक्री करताना मार्केटिंग उपलब्ध केली जाणार आहे.या योजनेत मुरली, सोनेगाव, चुल्हरडोह, पचारा, धनेगाव, दावेझरी, हरदोली, सिहोरा, सितेपार, वांगी गावाचा यात समावेश करण्यात आला आहे. साहित्य विक्रीत गावकऱ्याची होणारी लुट थांबविण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. गावात असणाऱ्या फळझाडांची सर्वेक्षण व नोंद करण्याचे कामांना गती देण्यात आली आहे. गावात फळ, मोहफुल, डिंग आदींची साठवणूक करण्यात येत आहे. परंतु साहित्य विक्रीला मार्केटिंग सापडत नसल्याने गावकऱ्यांची व्यापारी लुट करीत आहेत. आता हे साहित्य वन ग्राम समिती थेट लिलावात काढणार आहे. यामुळे गावकऱ्यांना थेट राशी प्राप्त होणार आहे. दरम्यान साहित्य विक्रीला मार्केटिंग प्राप्त करून देण्याची जबाबदारी वन विभागाच्या खांद्यावर आहे. यामुळे मुख्य प्रवाहात नागरिकांना आणण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे. एरवी जंगल आणि वनाचे संरक्षण व व्याप्तीचे विचार वन विभागात केलेजात असताना नागरिकांना रोजगाराची उब देण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आल्याने निश्चितच वन आणि जंगलांना अच्छे दिन येणार आहेत.
आता ग्रामस्थांना मिळणार सौर चुली
By admin | Updated: January 25, 2016 00:38 IST