मोहाडी : आता रोवणी करण्याचे काम यंत्राच्या मदतीने होत असल्याने शेतकऱ्यांना रोवणीसाठी मजूर गोळा करण्याची धडपड थांबणार आहे. जिल्ह्यात रोवणी यंत्राने रोवणी करण्याचे प्रात्यक्षिक कृषी विभागाने पिंपळगाव येथे केले.भात रोवणी यंत्राच्या सहाय्याने पिंपळगाव झंझाड येथे जिल्ह्यात प्रथम प्रयोग करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुदळे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, कृषी विकास अधिकारी किरवे, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, मंडळ कृषी अधिकारी भट, झलके, सार्वे, गणेश शेंडे तसेच तालुक्यातील बरेच शेतकरी उपस्थित होते. यंत्राने भात रोवणीचा प्रयोग विष्णू आतीलकर यांच्या शेतात करण्यात आला.ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिराटा, चिखलणी, पेरणी, मळणी आदी कामे शेतकरी झटपट करू लागले. यामुळे मनुष्यबळ व वेळ बचतीचा लाभ व्हायला लागला. आता रोवणी करणारे यंत्राने रोवणी होवू लागल्याने शेतकऱ्यांना रोवणीसाठी महिला मजूर गोळा करण्याची मेहनत कमी झाले आही. कृषी विभागाकडून भात रोवणीचे यंत्र अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी भाताची रोवणी करण्यासाठी पारंपारिक पद्धत सोडून आधुनिक व यंत्राच्या मदतीने रोवणी करणे सहज, सोपे झाले आहे. रोवणीसाठी मजुरांसाठी गाव, शेजारील परिसरात शेतकऱ्यांना फिरावे लागते. त्या मजुरांना शेतापर्यंत ने आण करण्याची सोयही शेतकरी करतात. मजुरांअभावी भात रोवणी उशिरा होत असल्याची ओरड ऐकायला यायची. आता मात्र भातपिकाची रोवणी करण्यासाठी यंत्र आल्याने मनुष्यबळाची व वेळेची बचत अधिक होणार आहे. भात रोवणी यंत्राचे सहाय्याने रोवणी केल्यास मजुरांची संख्या पाच ते सहा लागते. रोपवाटिकेसाठी पारंपारिक पद्धतीपेक्षा ५० टक्केपेक्षा कमी जागा लागते. जिथे ३० कि.ग्रॅ. लागते येथे नव्या पद्धतीत १५ ते २० कि.ग्रॅ. बियाणेची आवश्यकता असते. रोवणीसाठी १६ ते १८ दिवसांची रोपे वापरता येऊ शकते. दोन रोपांमधील व दोन ओळींमधील अंतर एकसमान ठेवता येते. कुटुंबातील व्यक्तींकडून देखील रोवणी करता येवू शकते. रोवणी यंत्राने मानवी कष्ट कमी लागते. पारंपरिक रोवणी पद्धतीत रोवणीचा खर्च प्रती एकरी २५०० रु. लागतो. यंत्राच्या सहाय्याने रोवणी केल्यास रोवणीचा खर्च ५०० रु. पेक्षा कमी येतो. अने १५ ते २० टक्के उत्पादनही जास्त येण्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
आता रोवणीही होणार यंत्राच्या मदतीने
By admin | Updated: July 21, 2014 00:01 IST