लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा जोपासता यावा, त्याला चालना मिळावी व पयार्याने कलावंतांना त्यांच्या हक्काची जागा मिळावी, या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने येथील जकातदार शाळा परिसरात भव्य सांस्कृतिक भवनाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर याठिकाणी अनेक राज्यस्तरावरील प्रख्यात अभिनेते, कलावंत यांचे कार्यक्रम पार पडले. मात्र, आज कुणीही या भवनाकडे फिरकूनही पाहत नाही. त्यामुळे हे भवन आता समाजविघातक कृत्यांचा अड्डा बनत चालला आहे..तत्कालिन मुख्यमंत्री बॅरी. ए.आर. अंतुले यांच्या पुढाकाराने प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक भवनाची पायाभरणी करण्यात आली होती. भंडाऱ्यात १९८५-८६ मध्ये भवनाच्या बांधकामाला सुरुवात झाली. एक कोटी रुपये या भवनासाठी खर्च करण्यात आले होते. या भवनात सुसज्ज सभागृह, व्हरांडा, नाट्यगृह आदी बांधण्यात आले. या सांस्कृतिक भवनाच्या निर्मितीनंतर माहिती व जनसंपर्क महासंचनालयातर्फे आठवडाभर सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडले. त्यावेळी या भवनामुळे जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रमाचा पाया रोवला जाईल, असे भाकित वर्तविले गेले होते. परंतु, त्यानंतर या भवनाची जी दुर्दशा होत राहिली, ती अद्यापही सुस्थितीत आली नाही. आणि त्याकडे कुणाचे लक्षही गेले नाही. सांस्कृतिक भवनाचे दरवाजे, पंखे, टाक्या, रेलिंग आदी सामान चोरुन नेण्यात आले. घन मारुन भिंतीना फोडण्यात आले. त्यातील लोखंडाच्या सळाखी विकून अनेकांनी पोट भरले. घन मारल्याचा आवाज रात्रभर यायचा, असे परिसरातील लोक सांगतात. चोरीचे प्रकार आतापर्यंत सुरुच होते. या भवनात आता एकही साहित्य शिल्लक नाही. केवळ विटा व सिमेंटने तयार केलेला सांगाडा तेवढा उभा आहे. भवन परिसरात स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. या भवनाच्या निर्मितीनंतर या भवनाकडे जाणाऱ्यांची गर्दी दिसायची. या भवनाला इतिहास आहे. या ठिकाणी अनेकांनी भेटी दिल्या आहेत. मात्र आज या भवनाचा उपयोग सार्वजनिक शौचालयासाठी होतो. राज्यशासन, जिल्हा प्रशासन यांच्या दुर्लक्षित धोरणांमुळे सांस्कृतिक भवनाची अशी दशा झाली आहे. यासाठी संपूर्ण यंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप सामान्य नागरिक व कलावंतांकडून होत आहे. शहराच्या मधोमध प्रशस्त जागेत भवनाची टोलेजंग इमारत बांधूनही त्याचा कोणताही वापर होत नाही, ही यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.सांस्कृतिक भवन नसल्याने जिल्ह्यात होणारे प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम भाड्याने घेतलेल्या सभागृहांमध्ये आयोजित केले जातात. येथील कलांवतांनी सांस्कृतिक भवनाच्या पुर्नजिवनासाठी अनेकदा मागणी केली. माध्यमांनीही हा मुद्दा उचलून धरला. परंतु, शासनाला जाग आली नाही. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे लोकप्रतिनिधी सांगत असले तरी याची अंमलबजावणी करण्याचे धाडस कुणीही दाखविले नाही.
सांस्कृतिक भवन नव्हे समाजविघातक कृत्यांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST
तत्कालिन मुख्यमंत्री बॅरी. ए.आर. अंतुले यांच्या पुढाकाराने प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक भवनाची पायाभरणी करण्यात आली होती. भंडाऱ्यात १९८५-८६ मध्ये भवनाच्या बांधकामाला सुरुवात झाली. एक कोटी रुपये या भवनासाठी खर्च करण्यात आले होते. या भवनात सुसज्ज सभागृह, व्हरांडा, नाट्यगृह आदी बांधण्यात आले. या सांस्कृतिक भवनाच्या निर्मितीनंतर माहिती व जनसंपर्क महासंचनालयातर्फे आठवडाभर सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडले.
सांस्कृतिक भवन नव्हे समाजविघातक कृत्यांचा अड्डा
ठळक मुद्देभंडारा येथील प्रकार: भवनाच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष